चंदगड बीआरसी कडून अडकूर हायस्कूलमध्ये सेतू अभ्यासक्रम पडताळणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2021

चंदगड बीआरसी कडून अडकूर हायस्कूलमध्ये सेतू अभ्यासक्रम पडताळणी

बीआरसी तज्ञ शिक्षक भाऊ देसाई हे हर्षदा पाटील हिला सेतू उपक्रमाची माहिती देताना.

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

          विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय क्षमता वाढीसाठी सेतू अभ्यासक्रम चालू असून या अभ्यासक्रमाची पडताळणी श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे चंदगड बीआरसी चे तज्ञ विषय शिक्षक भाऊ अमृत देसाई यानी केली.

        गेल्यावर्षी करोना काळातील ऑनलाइन शिक्षणामध्ये दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षांतील विषयनिहाय क्षमता संपादनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सेतू अभ्यासक्रम विकसित केला आहे. मराठी, हिंदी,गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्र विषयांतील महत्त्वाच्या क्षमतांचा अभ्यासक्रमात समावेश असून, सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम १ जुलै ते १४ ऑगस्ट दरम्यान पूर्ण करावा लागणार आहे.

         गेल्या शैक्षणिक वर्षांत विविध माध्यमाद्वारे शिक्षणासाठीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू न शकल्याने विद्यार्थ्यांना विषयनिहाय क्षमता संपादित करण्यात अडचणी निर्माण झालेल्या असू शकतात. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षांची उजळणी होऊन मागच्या इयत्तेतील क्षमता आणि नव्या इयत्तेतील क्षमतांचा सेतू या अभ्यासक्रमातून साधला जाईल.

            सेतू अभ्यासक्रमाद्वारे प्रत्येक वंचित घटकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शाळा बंद असतानाही प्रत्येक मूल शिकत राहील आणि आपल्या इयत्तांच्या क्षमता पूर्ण करेल,

                        कृतिपत्रिका आणि तीन चाचण्या

            सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत देण्यात आलेल्या विषयनिहाय कृतिपत्रिका विद्यार्थ्यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्रांच्या मदतीने सोडवायच्या आहेत.  शिक्षकांना या कृतिपत्रिकांचा अंतर्गत मूल्यमापनासाठीही उपयोग होईल. अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या तीन चाचण्या  सोडवायच्या आहेत. शिक्षकांनी चाचण्यांच्या गुणांची नोंद ठेवायची आहे. सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरच संबंधित इयत्तेच्या अभ्यासक्रमाची अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू होईल.

               सर्व विद्यार्थ्यांनी विषय शिक्षकांच्या सुचनेनुसार दररोज सर्व विषयांची कृती पत्रिका पूर्ण करण्याची आहे. हे काम व्यवस्थित केले जात आहे की नाही याची सविस्तर तपासणी आज करण्यात आली. यासाठी इयत्ता आठवीच्या दोन मूलांना व दोन मूलींना मोबाईलवर सेतू अभ्यासक्रम सोडविण्यास सांगून त्यांचा गुणांची पडताळणी करण्यात आली. श्री शिवशक्ती हायस्कूलमधील विद्यार्थीं-विद्यार्थिनिंची प्रगती अत्यंत समाधानकारक असल्याचे मनोगत बीआरसी तज्ञ शिक्षक भाऊ देसाई यानी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment