गंभीर आजारी दीक्षाच्या उपचारासाठी शिक्षकांची आर्थिक मदत - चंदगड लाईव्ह न्युज

07 July 2021

गंभीर आजारी दीक्षाच्या उपचारासाठी शिक्षकांची आर्थिक मदत

 

पारगड येथील दीक्षा यशवंत कांबळे च्या उपचारासाठी मदत निधी देताना मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
        ऐतिहासिक किल्ले पारगड (ता. चंदगड) येथील कु. दीक्षा यशवंत कांबळे ही मेंदू विकाराने आजारी आहे. डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचार घेणाऱ्या दिक्षाच्या उपचारांचा खर्च गरीब कांबळे कुटुंबीयांना न पेलणारा होता. हे समजताच चंदगड पंस. चे संवेदनशील सभापती ॲड. अनंत कांबळे, विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे, पारगड येथील सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार आदींनी मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत हेरे केंद्रातील शिक्षकांनी आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला.
     तालुक्यातील अतिदुर्गम आशा इसापूर येथील माध्यमिक शाळेत नववीत शिकणारी दीक्षा पारगड ते इसापुर हे जंगलातील चार-पाच किलोमीटर अंतर रोज जा-ये करत होती. हसतखेळत, खंबीरपणे तिची शैक्षणिक वाटचाल सुरू होती. मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी तिला अचानक त्रास होऊ लागल्यामुळे इस्पितळात दाखल केल्यानंतर मेंदूविकाराचे निदान झाले. उपचारासाठी लागणारा खर्च मोठा होता. मदतीच्या आवाहनानुसार  पं. स. मधील अधिकारी, कर्मचारी, हेरे ग्रामपंचायत, केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, परिसरातील काही दानशूर व्यक्तींनी मदत केली.  अजूनही मदतीची आवश्यकता आहे. यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे.
       पारगड येथे दीक्षा च्या आई-वडिलांकडे मदतनिधी सुपूर्त प्रसंगी सभापती कांबळे, विस्तार अधिकारी एम टी कांबळे,  रघुवीर शेलार, वाघोत्रेचे सरपंच मारुती गावडे, अध्यापक बोरगुले, विठ्ठल पाटील, विष्णू कांबळे, रमावती कांबळे, राजाराम कांबळे आदींची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment