रविवारी बेळगाव सीमाभागात ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपदी साहित्यिक श्रीराम पचिंद्रे, खासदार राउत यांच्या हस्ते होणार उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2021

रविवारी बेळगाव सीमाभागात ऑनलाईन मराठी साहित्य संमेलन, अध्यक्षपदी साहित्यिक श्रीराम पचिंद्रे, खासदार राउत यांच्या हस्ते होणार उद्घाटन


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा द्वारे दुसरे ऑनलाईन अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले  आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी  साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.

        अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा आयोजित दुसरे ऑनलाईन अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ऑनलाईन प्रणालीद्वारे २५ जुलै २०२१ रोजी होत आहे. हे साहित्य संमेलन  साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत करणार आहेत.

       संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष , ज्येष्ठ साहित्यिक , चित्रपट निर्माते शरद गोरे असणार आहेत.दुसऱ्या सत्रात कवी संमेलन अध्यक्ष म्हणून यवतमाळचे कवी आनंद शेंडे असणार आहेत. बेळगाव शहरात गेल्यावर्षी ८ मार्च २०२० रोजी पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन या परिषदेच्या मार्फत भरविण्यात आले होते ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.  सीमाभागात  या संमेलनामुळे चैतन्य निर्माण झाले होते.

           कोरोणाचा प्रार्दुभाव असल्याकारणाने यावर्षी संमेलनात खंड पडू नये तसेच बेळगाव सीमाभागात मराठी भाषा , संस्कृती यांचा संवर्धन व्हावं ,साहित्यप्रेमींना एक व्यासपीठ मिळावे , लिहित्या हातांना बळ मिळावं म्हणून लोकडॉऊन काळात सुद्धा ऑनलाईन हे संमेलन ठरवण्याचं बेळगाव अखिल भारतीय साहित्य परिषद शाखेच्यावतीने आयोजन केले आहे. 

         हे संमेलन दोन सत्रात असून या संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून शिवसंत संजयजी मोरे , बेळगाव मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव ,अहमदनगर चे कवी डॉक्टर अमोल बागुल ,मुंबई प्रदेशाध्यक्ष राजश्री बोहरा ,नाशिक जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर,बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण , उपाध्यक्ष डी.बी .पाटील , रणजीत चौगुले , संजय गुरव , एम. वाय . घाडी ,बेळगाव महिला उपाध्यक्षा अरुणा गोजे - पाटील ही मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. 

        कवी संमेलनामध्ये बेळगाव सीमाभागासह ,पश्चिम महाराष्ट्र विदर्भ ,मुंबई , कोकण या विभागातील कवींचा सहभाग असणार आहे. अशी माहिती संमेलनाचे  निमंत्रक व अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कर्नाटक राज्याचे प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी दिली.




No comments:

Post a Comment