दुपारनंतर पावसाची काहीशी उसंत, पुराचे पाणी ओसरतय, अडकूर पुल वाहतुकीला खुला, दाटेसह अन्य मार्ग तिसऱ्या दिवशी बंदच - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2021

दुपारनंतर पावसाची काहीशी उसंत, पुराचे पाणी ओसरतय, अडकूर पुल वाहतुकीला खुला, दाटेसह अन्य मार्ग तिसऱ्या दिवशी बंदच

चंदगड-हेरे मार्गावर अजूनही चार फुट पाणी असल्याने वाहतुक बंद आहे. 

संपत पाटील / सी. एल. वृत्तसेवा, चंदगड

गेले चार-पाच दिवस सुरु असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह चंदगड तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली होती. शुक्रवारी आलेला पुर पाहून लोकांना २०१९ रोजी आलेल्या पुराच्या आठवणी ताज्या झाल्या. पुरामुळे तालुक्यातील सर्वच मात्र बंद असल्याने वाहतुक ठप्प झाली होती. अनेक गावांचा चंदगड शहराशी संपर्क तुटला होता. बेळगाव-वेगुर्ला मार्गावर दाटे येथे राज्यमार्गावर पुराचे पाणी आल्याने गेले दोन दिवस या मार्गावरील वाहतुक ठप्प होती. आज या मार्गावरील पाणी थोडेफार कमी झाले असले तरी वाहतुक बंदच आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुतर्फा दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाने अशीच उसंत दिल्यास पुराचे पाणी ओसरुन उद्यापर्यंत बेळगाव वेगुर्ला व चंदगड-हेरे हे दोन मार्ग सुरु होण्याची शक्यता आहे. 

चंदगड शहराच्या शिवारामध्ये अजूनही पाणी आहे.

दुपारनंतर पावसाचे थोडीफार उसंत दिल्याने पुराचे पाणी ओसरायला मदत झाली आहे. मात्र जेवढ्या गतीने पुराचे पाणी पसरले. तेवढ्या गतीने पाणी ओसरताना दिसत नाही. कारण तालुक्यात सर्वच ठिकाणी पुरस्थितीमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी हळुहळु उतरत आहे. मुसळधार पावसामुळे ओढे व नाले ओसंडून वाहिले. काही ठिकाणी ओढ्यांनी पुराच्या पाण्यामुळे आपले प्रवाह बदलल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीदेखील वाहून गेल्याने दिसत आहे. तर काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. 

शिवाराला आलेले तळ्याचे स्वरुप.

पुरामुळे चंदगड कॉलेज रोडवर चार फुट पाणी आले होते. मात्र पावसाने उसंत दिल्याने आज हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मात्र चंदगड हेरे मार्गावर आजही चार फुट पाणी आहे. तरीही याच पाण्यातून काही नागरीक आपला जीव धोक्यात घालून ये-जा करताना दिसत होते. पुर कालावधीमध्ये प्रशासनाने अशा ठिकाणी कर्मचारी नियुक्त करावा. जेणेकरुन अशा लोकांच्यावर अंकुश येईल व दुर्घटना घडणार नाही. अडकूर येथे गेल्या साठ वर्षात पहिल्यांदाच पुराच्या पाण्यात अडकुरला पुल बुडाला होता. मात्र आज हा पुल वाहतुकीला खुला झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजुला शिवारामध्ये पुराचे पाणी अजूनही आहे. 

चंदगड शहराच्या काॅलेज रोडवर पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत पुराचे पाणी आले होते. आज हे पाणी उतरल्याने वाहतुक सुरळीत झाली. 

     वीज वितरणचा चांगला प्रयत्न........

       वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या पुर काळातही अखंडीत सेवा देण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात काही भागात वीजपुरवठा सुरळीत सुरु होता. पुरामुळे काही भागात पोहोचता न आल्याने त्या ठिकाणी वीजेचा लपंडाव सुरु होता. वादळी वारे व मुसळधार पावसातही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना अखंडीत सेवा देण्याचा चांगला प्रयत्न केल्याने लोक एकमेकांच्या संपर्कात राहिले. 

बेळगाव-वेगुर्ला रोडवर दाटे येथील रस्त्यावर पुराचे पाणी असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. 

मोबाईल कव्हरेज नसल्याने काहींचा संपर्क तुटला..........

शहरामध्ये काही खाजगी कंपन्याचे मोबाईल टॉवर जवळपास दोन दिवस बंद असल्याने संबंधित कंपनीच्या ग्राहकांना समस्यांचा सामना करावा लागला. या पुराच्या काळातही बी.एस.एन. एल. या कंपनीने ग्राहकांना अखंडीत सेवा दिली. २०१९ च्या महापुराच्या काळात बी. एस. एन. एल. या एकमेव कंपनीने ग्राहकांना एकमेकांच्या संपर्कात ठेवले होते. आताही कंपनीने दिलेल्या अविरत सेवेबद्दल ग्राहकांच्यातून कंपनीबद्दलचा विश्वास वाढला आहे. शहरामध्ये आणखी एका खासगी कंपनीनेही अविरत सेवा दिली आहे. 




No comments:

Post a Comment