संजय पाटील, कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कोविड -१९ च्या दुसऱ्या लाटेचा सामना आज संपूर्ण देश करत आहे. सद्यस्थितीत कोविडचा सामना करण्यासाठी अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने कोविड आयसोलेट सेंटर उभारण्यात येत आहेत. कोवाड (ता. चंदगड) येथेही अशा कोविड आयसोलेट सेंटरची गरज निर्माण झाली असून लोकप्रतिनिधीनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कर्यात भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड मध्ये आयसोलेट सेंटरची मागणी जोर धरत आहे.
कोरोना विषाणूने आपले संपूर्ण जग बदलून टाकले. अनेकांचे होत्याचे नव्हते झाले, जीवाला जीव देणारी माणसे अचानक बघता बघता डोळ्यासमोरुन नाहीशी झाली. आयुष्यात एक रिकामेपण आले. जे पुन्हा कधीही भरून न निघणारे आहे. कोवाडपासून चंदगड व कानूर कोविड सेंटर ३० कि. मी. अंतरावर आहेत. अशा परिस्थितीत चंदगड व नेसरी आदी अनेक ठिकाणी प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर वेळेत उपचार व्हावेत. या दृष्टीकोनातून लोकप्रतिनिधी व समाजसेवी संस्थाकडून कोविड आयसोलेट सेंटर उभारण्यात आली आहेत. चंदगड येथे एक तर येथून जवळच असणाऱ्या नेसरी या ठिकाणी एक कोविड आयसोलेट सेंटर उभारण्यात आलेली असून त्या ठिकाणी प्राथमिक लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. ही सर्व सेंटर कोविड बाधित रुग्णांसाठी संजीवनीचे काम करत असताना कर्यात भागात मोठी बाजारपेठ असलेल्या कोवाड मध्ये कोविड सेंटर उभे करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
गेल्या काही दिवसात १६ बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे या ठिकाणी नागरिकातून कोविड सेंटर उभारण्याची मागणी जोर धरत आहे. याठिकाणी सद्यस्थितीत पहायला गेलं तर बँका, बाजारपेठ मधील गर्दी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वाढता ताण लक्षात घेता कोविड आयसोलेट सेंटर उभारण्याची नितांत गरज असल्याचे चित्र आहे. कोविड सेंटर साठी आश्रम शाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा सारख्या ठिकाणी सर्व सुविधा असताना देखील आजवर कोवाड हे गाव कोविड आयसोलेट सेंटरच्या प्रतीक्षेत आहे.
रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीमुळे बाजारपेठ बंद करावी लागत आहे. त्यामुळे दोन वर्षां पासून मेटाकुटीला आलेल्या येथील व्यापारी वर्गाला देखील बाजारपेठ बंद ठेवावी लागते असल्याने फटका बसत आहे. त्यामुळे कोवाड सारख्या ठिकानी आयसोलेट सेंटर उभे राहिल्यास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी होऊन कोविड बाधित रुग्णांची सोय होण्यास मदत होणार हे निश्चित.
No comments:
Post a Comment