कोवाड येथे तीन दिवस जनता कर्फ्यू, बँकांसह सर्व व्यवहार बंद - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2021

कोवाड येथे तीन दिवस जनता कर्फ्यू, बँकांसह सर्व व्यवहार बंद

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कोवाड (ता. चंदगड) येथे गेल्या आठ दिवसात कोरोना पॉझिटिव पेशंट अधिक प्रमाणात सापडू लागले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून गावात तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

          ग्रामपंचायत प्रशासन, कोरोना दक्षता कमिटी, व्यापारी संघटना, पोलीस व महसूल विभाग यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोवाड येथे रविवार, सोमवार व मंगळवार असे तीन दिवस कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. जनता कर्फ्यू काळात सर्व प्रकारची दुकाने, बँका, पतसंस्था आदी बंद राहणार आहेत. याची पंचक्रोशीतील नागरिकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन सरपंच सौ अनिता भोगण यांनी बैठकीनंतर केले. यावेळी उपसरपंच पुंडलिक जाधव, ग्राम विकास अधिकारी जी एल पाटील, ग्रामपंचायत, दक्षता कमिटी व व्यापारी संघटनेचे सदस्य, पोलीस व महसूल विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

           दरम्यान आज शनिवार दि. १० रोजी आरोग्य विभागामार्फत कोवाड येथे घेण्यात आलेल्या कोरोना तपासणी कॅम्पचा ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे लाभ घेतला. यावेळी  आरटी-पीसीआर व रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली. यात तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून काही अहवाल प्रलंबित आहेत.




No comments:

Post a Comment