![]() |
कोवाड स्टॅन्ड नजीक बेळगाव रस्त्यावरील खड्ड्यातून वाट काढताना वाहनधारक. |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील बेळगाव स्टॅन्ड नजीक कोवाड- बेळगाव मार्गावर केबल साठी मारलेली चर अपघातांना आमंत्रण देत आहे. प्रवासी व वाहनधारकांसाठी जीवघेण्या ठरलेल्या या खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले असून चार चाकी गाड्यांचे नुकसान नित्याची बाब झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
दोन वर्षापासून किणी हद्दीतील मोबाईल टॉवर नजीक मारलेली आडवी चर योग्य पद्धतीने बुजवून डांबरीकरण न केल्यामुळे नेहमीच अपघातांना निमंत्रण देत आहे. शेजारील रहिवासी व दुकानदार अधून मधून नाईलाजास्तव स्वखर्चाने भराव टाकत असतात. तथापि पंधरा दिवसात जैसे थे स्थिती होते. गेल्या आठवड्यातील ताम्रपर्णी नदीच्या पुरात हा रस्ता बुडाल्यामुळे हा खड्डा अधिकच धोकादायक बनला आहे. खड्डा चुकवताना एका वेळी अधिक वाहने आल्यास किंवा रात्री अपरात्री वेगाने येणाऱ्या वाहनांसाठी जास्तच धोकादायक ठरत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी व रस्ता योग्य पद्धतीने दुरुस्त करावा अशी मागणी प्रवासी, वाहनधारक, व्यापारी व रहिवाशी यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment