कोरज येथे दोघा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून चार लाखाला लुटले - चंदगड लाईव्ह न्युज

09 August 2021

कोरज येथे दोघा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून चार लाखाला लुटले


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव-वेंगूर्ला राज्यमार्गावर कोरज (ता. चंदगड० गावानजिक दोघा पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दोघा अज्ञातांनी तीन लाख ९० हजार रूपये लुटले. ही घटना रविवारी (ता. 8) रात्री दहाच्या सुमारास घडली.

       याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, ``नागणवाडी (ता. चंदगड) येथील दत्तगुरू इटरप्रायजेस या पेट्रोल पंपावर  जनार्दन जानबा कुंदेकर (रा. बेळेभाट, ता. चंदगड) आणि गणपत सतबा आवडण (रा. बागिलगे, ता. चंदगड) हे दोघे कामाला आहेत. काम आटोपून पंपावर जमा रक्कम घेऊन ते वेगवेगळ्या मोटारसायकलवरून गावी चालले होते. कोरज गावच्या हद्दीत कोनेवाडी फाट्यावर हे दोघेही आले असता त्यांच्या पाठीमागून दोन मोटारसायकलवरून आलेल्या चौघा अज्ञातांनी  कुंदेकर व आवडण यांना अडविले. कुंदेकर याला दोघांनी पिस्तूल दाखवून शिव्या देऊन पैसे काढ, अशी धमकी दिली व गाडीच्या डिकीतील पैशाची पिशवी व खिशातील रेडमी कंपनीचा मोबाईल काढून घेतला. याचवेळी आवडण ओरडण्याचा प्रयत्न करत असताना अन्य दोघांनी त्याला चाकूचा धाक दाखवून शांत बैस नाहीतर कापून टाकीन अशी धमकी देऊन शांत बसवले व चौघेही पसार झाले. पंपावरील जमा रक्कम कर्मचारी कधी आणि कशी नेतात याचा सुगावा लुटारूंना आधीच लागला असावा आणि त्यांचा पाठलाग करत निर्मनुष्य असलेले ठिकाण निवडून कोरजजवळ संधी साधली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आहे. घटनेनंतर दोडामार्ग, सावंतवाडी, गडहिंग्लज, बेळगाव या दिशेने लुटारूचा शोध घेण्यासाठी  पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. 

           दरम्यान घटनास्थळी गडहिंग्लज उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत सुचना दिल्या. बेळगाव-वेंगूर्ला मार्गावर मोठी  रहदारी असूनही  दहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पंपावरील एवढ्या मोठ्या रक्कमेची चोरी होण्याची हि पहिलीच वेळ असून या चोरीमुळे चंदगड पोलिसांसमोर चोरांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.




No comments:

Post a Comment