'माणूस' घडवणाऱ्या शिक्षणाची गरज! - विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2021

'माणूस' घडवणाऱ्या शिक्षणाची गरज! - विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे

सरस्वती विद्यालय कालकुंद्री येथे विद्यार्थीगुणगौरव प्रसंगी मान्यवरांसह शिक्षक व विद्यार्थी.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा  

         जो विद्यार्थी नेहमी चांगले ऐकतो तोच चांगले बोलू शकतो, प्रत्येकाने आपला भूतकाळ कधीही विसरता कामा नये. आपण कोठून आलो, आपण कोठे आहोत, आपल्याला कोठे जायचे आहे? याची जाणीव हवी. सद्यस्थितीत 'माणूस' घडवणाऱ्या शिक्षणाची गरज आहे असे प्रतिपादन चंदगड पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे यांनी केले. ते श्री सरस्वती विद्यालय व लोकनेते तुकाराम पवार जुनिअर कॉलेज कालकुंद्री (ता. चंदगड) येथे नवागतांचे स्वागत व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी रा. ना. पाटील गुरुजी होते.

     स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. एल. बेळगावकर यांनी केले. पुढे बोलताना कांबळे म्हणाले, 'श्री सरस्वती विद्यालय'  हे तालुक्यातील पहिले माध्यमिक विद्यालय, तालुक्यात सध्या ६९ विद्यालये आहेत. तथापि ६९ वर्षानंतरही या  विद्यालयाची गुणवत्ता कायम आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा गरजेपुरता वापर करावा. आपल्याला माणूस होण्याची संधी मिळाली आहे. पण माणूसपण हरवू देऊ नका असा संदेश दिला. यावेळी पृथ्वीराज गजानन पाटील, उज्ज्वला चंद्रकांत पाटील, प्राची सटूप्पा मुंगुरकर या विद्यार्थी व ई.एल्. पाटील, प्रा. आर. बी. पाटील यांची भाषणे झाली. 

         शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यांचे स्वागत व NMMS परीक्षेत शिष्यवृत्ती धारक तसेच SSC परीक्षा व HSC परीक्षा  कला व विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  शालेय समिती सदस्य एम बी पाटील, आर आर देसाई, चंद्रकांत  पाटील, सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक माने यांनी केले. आभार प्रशांत कोकीतकर यांनी मानले. 

No comments:

Post a Comment