चंदगड, आजरा, आंबोली व बेळगाव परिसर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग - राजा शिरगुप्पे, नागरदळे येथे 'नागझरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2021

चंदगड, आजरा, आंबोली व बेळगाव परिसर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग - राजा शिरगुप्पे, नागरदळे येथे 'नागझरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन

 

नागरदळे येथे कवी शिवाजी पाटील लिखित 'नागझरी' काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
बेळगाव, कोवाड पासून आजरा, आंबोली, चंदगड ते बेळगाव हा भाग पृथ्वीवरील स्वर्ग आहे. जीवशास्त्र अभ्यासकांनी पृथ्वीवरील पाच ठिकाणी आदी जीवसृष्टी जिवंत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यापैकी हा परिसर आहे. याच भूमीत इंदिरा संत, रणजित देसाई, शिवाजी सावंत ही साहित्यरत्न निर्माण झाली असे प्रतिपादन साहित्यिक राजा शिरगुप्पे यांनी केले. ते नागरदळे ता. चंदगड चे सुपुत्र ह. भ. प. शिवाजी विष्णू पाटील लिखित 'नागझरी' काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वागत शिवाजी पाटील यांनी केले प्रास्ताविक नाट्यदिग्दर्शक जीवन कुंभार यांनी केले. पुढे बोलताना शिरगुप्पे म्हणाले, या परिसरातील लेखक साहित्यिकांना निसर्गच शब्दभांडार पुरवतो. येथील माणसेसुद्धा मनाने नैसर्गिक श्रीमंत आहेत. शिवाजी पाटील हे अंतर्बाह्य कवी असून त्यांच्या लेखणीत चौफेर लिखाणाचे सामर्थ्य आहे. भारतीय संस्कृती व निसर्ग साखळीत नागाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तो आपला शत्रू नसून देवता आहे. त्यामुळे 'नागझरी'  हे काव्यसंग्रहाचे नाव यथार्थ ठरते. कवी पाटील यांनी यात नदी, झरे, मंदिर, झाडे, जीवसृष्टीचे निसर्गदर्शन घडवले आहे. असे गौरवोद्गार शिरगुप्पे यांनी काढले. पैलवान विष्णू जोशीलकर म्हणाले रणजित देसाई यांच्या नंतर भागात दर्जेदार साहित्यिक निर्माण होत आहेत, ही अभिमानास्पद गोष्ट असून अशा उदयोन्मुख कलाकार व खेळाडूंच्या मागे तालुक्यातील जनतेचे नेहमीच पाठबळ राहिले आहे.  यावेळी पी ए पाटील (उपसंपादक दैनिक पुढारी) कृष्णा बामणे, मयुरी जाधव, एम व्ही पाटील, ए एस पाटील, सी एस गुरव आदींची भाषणे झाली. नागनाथ हायस्कुल नागरदळे येथे झालेल्या कार्यक्रमास गंगुबाई पाटील, लक्ष्मीबाई जोशिलकर, सत्यजित पाटील, तुषार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोवाड आयोजित खुल्या ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. आभार व सूत्रसंचालन सदानंद गावडोजी पाटील यांनी केले.




No comments:

Post a Comment