उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2021

उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा

 


माणगाव (राजेंद्र शिवणगेकर)

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील गणेश भक्तांच्या घरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेशाचे आगमन होते आणि वातावरण चैतन्याने भरून जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्र आजही त्याच हिरिरीने जपतो आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून यंदा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 'उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा' हा विषय घेऊन उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन 'घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. या स्पर्धेचा विषय 'उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा हा आहे. मताधिकार हा १८ वर्षांवरील नागिराकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे आवश्यक आहे. हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी, वगळणी यासंबंधीची जागरूकता करण्यासाठी अभिनव कल्पना राबवता येतील. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यांसारख्या विषयांवर, घरगुती गणेशोत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि समाजमाध्यमांवर स्पर्धेची सविस्तर नियमावली देण्यात आलेली आहे.

या स्पर्धेबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, तसेच मतदार नाव नोंदणी आणि वगळणी यांसाठी प्रसार-प्रचार केला जाणार आहे. गणेश मंडळाच्या मंडपात आणि ऑनलाइन माध्यमांद्वारेही ही जागृती केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे आणि बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी अधिकाधिक नागरिकांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दि. १ जानेवारी २०२२ या अर्हतादिनावर आधारित मतदार याद्यांच्या पुनरीक्षणांचा कार्यक्रम दि. १ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांच्या नोंदणीसाठी अर्ज स्वीकारले जातील.No comments:

Post a Comment