धनगरवाड्यातील घरात घुसला बिबट्या, चंदगड तालुक्यातील घटना, पुढे काय झाले.....वाचा सविस्तर...... - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2021

धनगरवाड्यातील घरात घुसला बिबट्या, चंदगड तालुक्यातील घटना, पुढे काय झाले.....वाचा सविस्तर......

घरात शिरलेला बिबट्या

नंदकुमार ढेरे / चंदगड

          तिलारीनगर (ता. चंदगड) जवळ असलेल्या कळसगादे पैकी बांदराई धनगरवाड्यात रामु भागु लांबोर यांच्या घरात कुत्र्याचा पाठलाग करत  शिरलेल्या बिबट्याने सहा तास नागरिकांचा श्वास रोखून धरला.प्रंसगावधन राखून लांबोर यांनी बाहेर पडून दाराची कडी लावल्याने अनर्थ टळला.

        कळसगादे पैकी बांद्राईवाडा येथे मंगळवार दि.२८ रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुर्ण वाढीचा बिबट भक्षाच्या शोधात आला.रामु लांबोर यांच्या दारात भाकरी खाणा - या कुत्र्यावर हल्ला करता पाठलाग करत सरळ जेवण खोलीत शिरला. तेथे श्री.लांबोर कुटुंबियांनी ओरडा - ओरड केलेनंतर बिबट चुलीवरील बडोदयावर ( तुळईवर ) चढला. त्यावेळी समय सुचकता दाखवत श्री.लांबोर यांनी आपली पत्नी साऊबाई, मुलगी निकिता, मुलगा सुभाष, दोन वर्षाचा मुलगा व विवाहीत मुली - लक्षी व नखलाताई व ४ नातवंडे मोठ्या शिताफीने घराबाहेर पडले. घराला बाहेरुन कडी घातली व रहायला शेजारील घरात गेले.दरम्यान वनविभागास फोन करून घटनेची माहिती दिली. 

           मुसळधार पाऊस व दाट धुकयात वनविभागाचे अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांसह पाहणी केली. घटनेचे गांर्भीय ओळखुन वनविभागाने कोल्हापुर येथील डॉ. संतोष वाळवेकर (पशुधन अधिकारी) यांच्या Rescue Team ला पाचारण केले. सदर टिम पहाटेे ४ वा पाटणे येथे दाखल झाली मात्र विदयुत पुरवठा खंडीत झालेने तसेच मुसळधार पाऊस व दाट धुक्यामुळे सकाळी ६.०० वा स्थानिक ग्रामस्थ व Rescue Team चे सदस्य व वनविभाग यांनी घटनास्थळी पिंजरा जाळी, दोरखंड व इतर साधन सामुग्रीसह दाखल झालेनंतर घरमालक श्री लांबोर यांनी पहाटेच्या अंधारात खिडकीचा पत्रा वाकवुन, वाट करुन बिबट निघुन गेलेची शंका व्यक्त केली. 

       मात्र धोका न पत्करता वनविभागाने एका दरवाजास पिंजरा लावला व मोठयाने आरडा -ओरडा करुन हुसकावले मात्र बिबट हालचाल दिसुन आली नाही. त्यानंतर सदर घरात कुत्रे सोडणेत आले व सभोवतालच्या खिडकी मधुन बॅटरीच्या प्रकाशात संपुर्ण घर शोधले मात्र काहीच सुगावा न लागलेने अनेर धाडसाने वनविभागाने घरमालकासह आत मध्ये जाऊन खात्री केली असता, खिडकी जवळील ओरखडे, विसखटलेले साहित्य, उचकटलेले खिडकीचे रिलींग तसेच तेथे बिबटयाचे लागलेले व पडलेले केस यावरुन बिबट पहाटेचा अंधार, पाऊस, धुक्याचा फायदा घेऊन बिबट मुळ अधिवासात निघुन गेला. यामध्ये श्री.लांबोर यांच्या प्रापंचीक साहित्याची मोठया प्रमाणात नासधुस केली आहे. वायर पटटया तोडल्या आहेत . स्पिकर फोडले आहेत. अन्न धान्य, भाजीपाला नासाडी केली आहे. खिडकी दरवाज्याच्या काचा फोडल्या आहेत. पण सुदैवाने यामध्ये कोणतेही पशुधन किंवा माणसास इजा केली नाहीत. तसेच सदर बिबट ही सुखरुप निसर्गात निघुन गेला आहे.वनक्षेत्रपाल पी. ए. आवळे वनपाल बी. आर. भांडकोळी, वनपाल डि. एच. पाटील वनरक्षक डि. एम. बडे, वनमजुर, मोहन तुपारे, तुकाराम गुरव व इतर कर्मचारी उपस्थित होते . Rescue Team चे डॉ. वाळवेकर व त्यांची टीम यांनी देखील सदर मोहिम पार पाडणेस विशेष मेहनत केली. बांदराई धनगरवाड्यावर यापुढे काही दिवस वनविभागाचे पथक गस्त घालणार आहेत. तरीही नागरीकांनी सावधानी बाळगावी असे आवाहन वनक्षेत्रपाल पी. ए. आवळे यांनी केले आहे.




No comments:

Post a Comment