कष्टाने पिकवलेल्या ऊसाची चोरी होत असेल तर शेतक-यानी कारखानदारांना जाब विचारा - राजू शेट्टी - चंदगड लाईव्ह न्युज

18 October 2021

कष्टाने पिकवलेल्या ऊसाची चोरी होत असेल तर शेतक-यानी कारखानदारांना जाब विचारा - राजू शेट्टी

आमरोळी येथे ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची सभा; एफआरपीबाबत आग्रही

आमरोळी (ता. चंदगड) येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,माजी खासदार राजू शेट्टी, शेजारी श्री. गडयाण्णावर व हुलजी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कारखानदाराकडून काटा मारणे, रिकव्हरी कमी दाखवणे अशी लबाडी केली जात असल्याने अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी काय करायचं? कष्टाने पिकवलेल्या ऊसाची कारखानदाराकडून जर चोरी होत असेल तर शेतकऱ्यांनी जागरूक राहून जाब विचारणे गरजेचे आहे असल्याचं प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,माजी खा. राजू शेट्टी यांनी व केलं.

       जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या विसाव्या उस परिषदेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी आमरोळी (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुवर्णा मंडलिक-पाटील होत्या.

     श्री शेट्टी पूढे म्हणाले की, ``सर्वत्र उसाची चोरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वजन तपासून घ्या,  एकरकमी एफ.आर.पी देण्याचा जीआर 2011ला आला आहे. त्यावेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी मी कोर्टामध्ये एकरकमी एफ.आर.पी साठी संघर्ष केला तसाच शेतकऱ्यांनी  एफआरपीसाठी संघर्ष करणे गरजेचे आहे. जयसिंगपूर येथे ऊस परिषदेला शेतकर्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

       राजेंद्र गड्याण्णावर म्हणाले, ``जेलुगडे येथे २००६ साली हत्ती मृत्युमुखी पडल्याने गावातील शेतकऱ्यांना भरपूर अडचणी आल्या होत्या. त्या अडचणीला शेट्टी यांनी परस्पर हाताळून घेतले.जयसिंगपूर येथे  ऊस परिषद आयोजित केली आहे. या चंदगड तालुक्यातील  शेतकरी बंधूनी जयसिंगपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

     यावेळी तालुकाध्यक्ष प्रा. दीपक पाटील म्हणाले, हेमरसने 2925 रुपये एफआरपी दर जाहीर केला आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत दौलत कारखान्याने अजून 235 रुपये फरक येणे बाकी असून तो द्यावा. तसेच यापूर्वी दूध, ऊस अन्य आंदोलने यशस्वी पार पाडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चंदगड तालुक्यातील 54 गावे सरंजाममध्ये असून जवळपास हजारो हेक्टर अजूनही शिल्लक आहे. ऊस परिषदमध्ये हमीभावसाठी राजू शेट्टी यांनी एफआरपी प्रमाणे तीन हजार ते साडेतीन हजार रुपये दर जाहीर केला होता. मात्र आता तो २९०० पर्यंत आणून ठेवला आहे. तो अजून वाढवून मिळाला पाहिजे.यावेळी महादेव मंडलिक-पाटील यांनीही  मनोगत व्यक्त केले.

        यावेळी पं. स. सदस्य जगन्नाथ हुलजी, बाळाराम फडके, शशिकांत रेडेकर, मारुती (पिंटू) गुरव, अनुराधा गुरव, विष्णुपंत यादव, जोतिबा कदम, रवी नाईक, विष्णू पाटील, सुरेश कुट्रे, अरुण केसरकर, विजय वाईंगडे, गौतम कांबळे, संजय गावडे, बाळू गावडे यांसह शेतकरी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment