कविता जगण्याचं भान असतं - सीमाकवी रविंद्र पाटील, संजय साबळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2021

कविता जगण्याचं भान असतं - सीमाकवी रविंद्र पाटील, संजय साबळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन


चंदगड येथे शिक्षक संजय साबळे यांच्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
         कविता जगण्याचं भान असतं, जीवनाच्या वाटेवर आलेल्या कटू गोड अनुभवांना शब्दांच्या माळेत गुंफन म्हणजे मनाची अस्वस्थता, नात्याचे दुरावले पण, माणसांचा स्वार्थीपणा, द्वेष, अहंकार, समाजात घडणाऱ्या या साऱ्याच दृश्यामूळे मनाची घालमेल अधिक वाढत जाते. मानवी मनाच्या कंगोऱ्यांना शब्दबद्ध करून आपल्या अभिव्यक्तीला वाट करून दिली की त्यातूनच कविता जन्माला येते असे मत सीमाकवी रवींद्र पाटील यांनी मांडले.
      दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांच्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रविंद्र पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.आय. पाटील होते.
       यावेळी स्वर्गिय र .भा. माडखोलकर यांच्या स्मृतिला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक प्रा. मनिषा आमणगी यांनी केले. पाहुण्याचा परिचय टी. टी. बेरडे यांनी करून दिला.

        दि न्यू इंग्लिश स्कूलचे अध्यापक संजय साबळे यांच्या 'काही बोलायचे आहे 'या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दि .१३ रोजी दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड येथील गोगटे सभागृहात अभामसा परिषद कर्नाटक राज्याध्यक्ष व  सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते तर 'एक तास आनंदाचा' या पुस्तकाचे प्रकाशन माजी प्राचार्य ए.एस.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

       शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चाकोरी बाहेरचे जग दाखविल्याशिवाय आपले विद्यार्थी बाहेरच्या स्पर्धेत टिकणार नाहीत. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला लिहिते आणि बोलते केले पाहिजे.' असे प्रतिपादन ए. एस. पाटील यांनी केले.
     लेखक व कवी संजय साबळे यापूर्वी अनोळखी वाटेवर, आभाळ दाटल्यावर, माझी शाळा माझे उपक्रम, साने गुरुजी एक विचार, विचारांची क्रांती, आठवणींच्या हिंदोळ्यावर, प्रतिज्ञा मंत्र इ. पंधरा पुस्तके यांची प्रकाशीत झाली आहेत.
       या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, ॲड. आर. पी. बांदिवडेकर, एल. डी. कांबळे, एस. जी. सातवणेकर, ए. जी. बोकडे, डॉ. सुजाता सप्ले, मारूती पाटील, नारायण माडखोलकर, गोपाळ बोकडे, प्रा. बी. डी. मोरे, आर. पी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. चिगरे यांनी तर आभार टी. एस. चांदेकर यांनी मानले.


No comments:

Post a Comment