ढोलगरवाडी सर्पोद्यान विस्तारीकरणाच्या आशा पल्लवित, ना. जयंत पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2021

ढोलगरवाडी सर्पोद्यान विस्तारीकरणाच्या आशा पल्लवित, ना. जयंत पाटील यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

सापाचे संग्रहित छायाचित्र

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         जगातील एकमेव सर्पशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ढोलगरवाडी, ता. चंदगड येथील सर्प शाळेचे रखडलेले विस्तारीकरण मार्गी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना सर्पोद्यान साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याविषयी पत्र दिल्याची माहिती शेतकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा सर्पोद्यान चे कार्यकारी संचालक तानाजी वाघमारे यांनी दिली.

           आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांनी स्थापन केलेल्या या सर्पोद्यान तथा सर्प शाळेस 'झू अथोरिटी ऑफ इंडिया नवी दिल्ली' व 'महाराष्ट्र झू अथोरिटी नागपूर' यांची आजतागायत मान्यता आहे. गेली पाच दशके सर्पोद्यान च्या माध्यमातून समाजातील सापांविषयीच्या अंधश्रद्धा, गैरसमजुती दूर करून शास्त्रीय माहिती दिली जाते. तसेच महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक इत्यादी राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, वन विभागातील अधिकारी कर्मचारी, पोलिस खाते, पर्यटक, इंडियन आर्मी चे जवान, कमांडो, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर आदिंना सापांविषयी शास्त्रोक्त माहिती उपलब्ध करून दिली जाते. सद्यस्थितीत तुटपुंज्या जागेत सुरू असलेली सर्प शाळा मध्यम प्राणिसंग्रहालयात रूपांतरित करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून स्थलांतरित करण्यासाठी लागणारी कार्यवाही करावी. अशा आशयाचे पत्र ना. जयंत पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज, तहसीलदार चंदगड कार्यालयातून जमीन अधिग्रहण प्रक्रियेला गती मिळेल! अशी अपेक्षा सर्पशाळा विस्तारीकरणाची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील सर्प प्रेमी व ढोलगरवाडी च्या शेतकरी शिक्षण संस्थेकडून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment