निट्टुर येथील सेवानिवृत्त सुभेदार मायाप्पा कांबळे यांचे निधन, सच्चा देशभक्ताची एक्झिट - चंदगड लाईव्ह न्युज

22 October 2021

निट्टुर येथील सेवानिवृत्त सुभेदार मायाप्पा कांबळे यांचे निधन, सच्चा देशभक्ताची एक्झिट

सुभेदार मायाप्पा गोविंद कांबळे

तेऊरवाडी (एस. के. पाटील)
निट्टुर (ता. चंदगड) येथील सेवानिवृत्त सैनिक सुभेदार मायाप्पा गोविंद कांबळे (वय ७६ ) यांचे गुरुवार दि. २१ऑक्टो. २०२१ रोजी सायंकाळी  अल्पशा आजाराने निधन झाले. माजी सैनिक  सुभेदार  मायाप्पा कांबळे यांचे शिक्षण ७  वी पर्यंत झाले होते . त्यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू व प्रेमळ असा होता. लहान थोर सर्वच लोकांशी ते एक मान ठेवून सर्वांना आदर देत त्यांच्याशी प्रेमळतेने बोलत असत. एखादी घटना घडली असेल तर ते पटकन आपला निर्णय देऊन त्या गोष्टीचा तोडगा काढत असत.  ते बेळगाव येथे सैन्यात भरती झाले. सैन्यात उल्लेखनीय अशी सेवा करून ते सुभेदार पदावरून  सेवानिवृत्त झाले. त्यांनी बेळगाव ,जम्मू - काश्मीर, हिमाचल प्रदेश, मेरठ, कानपूर, सागर अशा विविध ठिकाणी सेवा बजावली.१९६५ व १९७२ च्या भारत- पाक युद्धात ते सामील झाले होते. पाकिस्तान पासून बांगलादेश  या नव्या देशाची निर्मिती झाली तेंव्हा जी युद्ध्यजन्य परिस्थिती निर्माण झाली होती तेंव्हा त्या लढ्यात सुद्धा सुभेदार कांबळे यांनी आपला सहभाग घेतला होता. अशा या त्यांच्या विविध आणि धाडसी कामगिरीची दखल घेत भारतीय सैन्याकडून त्यांना विविध पदकांनी गौरविण्यात आले. भूतपूर्व राष्ट्रपती के. शंकर नारायण यांच्या हस्ते त्यांना विशेष असा सैन्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या धाडसी व विशेष कामगिरीची दखल घेत त्यांची सुभेदार पदी बढती करण्यात आली. सुट्टीवर गावी येतेवेळी ते गल्लीतील सर्वच लहानमुलांसाठी खाऊ घेउन येत असत. सर्वांवर ते पुत्रवत प्रेम करायचे.
 निवृत्ती नंतर त्यांना अनेक ठिकाणी नोकरीची संधी आली होती पण गावाकडची ओढ आणि समाजासाठी साठी आपण काहीतरी देण लागतो या भावनेपोटी त्यांनी संधी असताना सुद्धा  ती नम्रपणे नाकारली.निवृत्ती नंतरचे संपूर्ण आयुष्य त्यांनी समजाकार्यासाठी अर्पण केले. त्यांनी गावातील अनेक संस्थांमध्ये आपली महत्वाची भूमिका बजावली. शेतकरी दूध डेअरी संस्था निट्टुर, जोतिर्लींग  अशा अनेक संस्थांमध्ये ते संचालक व डायरेक्टर पदावर होते. या काळात त्यांनी या संस्था मोठ्या आणि नावारुपाला करण्यात विशेष प्रयत्न  केले . आजी- माजी सैनिक संघटना स्थापनेपासून सदस्य होते. ४ वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले, तो धक्का त्यांनी इतका जिव्हारी लावून घेतला आणि  तेंव्हापासूनच ते कायम अस्वस्थ असे राहू लागले. पण त्यांनी तो कधी इतरांना जाणवू दिला नाही. त्या प्रसंगीसुद्धा ते इतरांशी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे स्वभावानेच  वागत असत. त्यांच्या असे अचानक जाण्याने पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुली सौ.कांचन, सौ. मालती. जावई  निवृत्ती सावंत (क्लार्क - गोकुळ दूध  चिलिंग सेंटर तावरेवाडी) व ( सहदेव सावंत - महाराष्ट्र विद्युत ........) नातवंडे - सौ.प्राजक्ता, स्वप्नील, स्नेहल, ओमकार असा परिवार आहे. अशा या वीर भारतमातेच्या सुपुत्राला एका थोर समाजसेवकाला सलाम.





No comments:

Post a Comment