श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखानाचे चालू गळीत हंगामातील एफ. आर. पी. जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखानाचे चालू गळीत हंगामातील एफ. आर. पी. जाहीर

चेअरमन  समरजीतसिंह घाटगे
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कागल (ता. चंदगड)  श्री छत्रपती शाहू सहकारी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम -२०२१-२०२२ साठी एफ. आर. पी. ची  होणारी २९९३/- रूपये  इतकी रक्कम  एकरकमी देणार आहे, अशी घोषणा चेअरमन  समरजीतसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केली.

    या हंगामातील एफ. आर. पी. ची रक्कम एक रकमी देण्याचा निर्णय जाहीर करणारा शाहू कारखाना राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा शाहू कारखान्याच्या माध्यमातून निर्माण केली आहे. विद्यमान चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनीही या परंपरेमध्ये सातत्य राखत हा निर्णय जाहीर केल्यामुळे शाहू साखर कारखान्यास ऊस पुरवठा करणाऱ्या  सभासद शेतकरी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.

     ते पुढे म्हणाले, ``या वर्षी आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या ऊस पिकासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच राज्य शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना  दीड वर्षांपूर्वी जाहीर केलेले 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप जमा केलेले नाही. तसेच कर्जमाफीपासूनही काही शेतकरी  वंचित आहेत. त्यामुळे एकूणच शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला असून शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. अशा परिस्थिती मध्ये शाहू साखर कारखान्याने  एफ आर पी चे तुकडे न करता एकरकमी  देऊन दिलासा देण्याचा  निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. शाहू कारखान्यामध्ये ऊसदर काढण्याची परंपरा नाही.जो दर बसतो तो शेतकऱ्याला दिला जातो असेही ते म्हणाले.``

           ते पुढे म्हणाले, राजर्षी  छत्रपती शाहू महाराज, पिराजीराव घाटगे,स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी हरितक्रांती साकारली आहे.व शेतकऱ्यांना नेहमीच दिलासा देणारे निर्णय घेतले.  स्व. विक्रमसिंहजी  घाटगे यांनी तर शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त मोबदला देता यावा. यासाठी शाहू साखर कारखान्याची स्थापना केली . उच्चांकी ऊस दर देण्यात  शाहू कारखाना सातत्याने  अग्रक्रमावर राहिला आहे. हाच वारसा आम्ही  पुढे चालवीत आहोत याचा मला अभिमान असल्याचे सांगितले.

     यावेळी व्हाईस चेअरमन अमरसिंह  घोरपडे, संचालक डी. एस. पाटील, यशवंत उर्फ बॉबी माने, मारुती निगवे, सचिन मगदूम, भुपाल पाटील, बाबुराव पाटील, एम. डी. पाटील, पी. डी. चौगुले, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, फायनान्स मॅनेजर आर. एस. पाटील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment