कालकुंद्रीत 'बेल वृक्ष' पूजनाचा आनंदोत्सव! वाचा - काय आहे कारण? - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

कालकुंद्रीत 'बेल वृक्ष' पूजनाचा आनंदोत्सव! वाचा - काय आहे कारण?

कालकुंद्री येथे बेल वृक्षाचे पूजन प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ

 कालकुंद्री : श्रीकांत पाटील/ सी एल वृत्तसेवा

          बेलाच्या वृक्षाला धार्मिक तसेच आयुर्वेदात औषधी म्हणून अनन्य साधारण महत्त्व आहे. या झाडाला भगवान शंकराचे रूप मानले जाते. श्री शंकराच्या पिंडीवर नित्य बिल्वदले वाहिली जातात. याच्या पानांचा रस हृदयविकार, मधुमेह, गुडघेदुखी व पोटाच्या विकारावर रामबाण ठरतो. तर याच्या फळांमध्ये अनेक रोग नष्ट करण्याची क्षमता आहे. पाचक प्रणालीतील शक्तिशाली औषध म्हणून ओळखले जाते. याच्या सेवनाने आतड्यांची कार्यक्षमता वाढून भूक सुधारते. अशा धार्मिक व आयुर्वेदिक महत्त्व असलेल्या बहुगुणी बेलाच्या झाडाला फलधारणा झाल्याबद्दल कालकुंद्री ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत पर्यावरण विषयक संवेदनशीलता दाखवून दिली.
    कालकुंद्री, ता. चंदगड येथील छत्रपती शिवाजी महाराज या बस स्टॅन्ड नजीकच्या मुख्य चौकात शिवस्मारक समितीने चार-पाच वर्षांपूर्वी बेल वृक्षाचे रोपटे लावले होते. या रोपट्याचे झाड बनले असून त्याला नुकतीच फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उल्हसित झालेल्या शिव स्मारक समिती व ग्रामस्थांनी या बेल वृक्षाची सौ आनंदी व शिवाजी कल्लाप्पा पाटील- यमाजीगावडे या दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पूजा केली. "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!"  ही जगद्गुरु तुकोबारायांची उक्ती यानिमित्ताने सार्थ केली. यावेळी ग्रामीण वाद्यांच्या गजरात आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ऐन नवरात्रोत्सवात झालेल्या या कार्यक्रमास शिवाजी पाटील यांचे कुटुंबीय, स्मारक कमिटी सदस्य, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.No comments:

Post a Comment