दौलतला जाणीवपूर्वक विरोध नको - पत्रकार परिषदेत ॲड. मळवीकरांचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

05 November 2021

दौलतला जाणीवपूर्वक विरोध नको - पत्रकार परिषदेत ॲड. मळवीकरांचे आवाहन

दौलत साखर कारखान (संग्रहित छायाचित्र)

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       गेल्या चाळीस वर्षात दौलत मधील चिमणीतून डस्ट बाहेर पडतच होती. पण काही लोकांना ते प्रदूषण आताच का दिसते. दौलत साखर कारखाना तालुक्यातील शेतकऱ्यांची दौलत आहे. ती बंद पडली तर शेतकरी व कामगारावर अन्याय होणार आहे. दौलत बंद पडावा यासाठी तालुक्यातील काही छुप्या शक्ती सक्रिय आहेत. कारखाना वाचला तरच इथला शेतकरी वाचणार आहे. त्यामुळे शेतकरी, कामगारांच्या हिताच्या आड येणाऱ्यांनी जनता गय करणार नाही. त्यामुळे दौलत विरोधात कार्य करणाऱ्यांनी  विचार करावा असा इशारा ॲड. संतोष मळवीकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

        दहा वर्ष दौलत बंद असल्याने शेतकरी वर्गावर ऊस कसा घालवायचा प्रश्न निर्माण झाला होता तर कामगारावर उपासमारीची वेळ आली. दौलत चालवायला घेणाऱ्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले न देताच धुम ठोकली. मात्र दोन वर्षात अथर्व कंपनीने स्पर्धेतील कारखान्यांच्या बरोबरीने दर दिला आहे. इथेनॉल व वीज प्रकल्प सुरू झाल्यानंतर भविष्यात सर्वांपेक्षा जादा दर देणारा कारखाना असेल. प्रदूषणाच्या नावाखाली अनेकजण एमपीसीबीकडे जाणीवपूर्वक तक्रारी दाखल करत आहेत. त्यामुळे अथर्व प्रशासनाला वेगळाच संशय येत आहे. अथर्व कंपनी गेली तर पुन्हा येथे कुठलीही कंपनी येणार नाही. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. संघर्षाची ठिणगी पडू नये याची काळजी छुप्या रुस्तुमानी घ्यावी. काही प्रश्न असल्यास ते चर्चेअंती सोडवता येऊ शकतात, त्यासाठी छुप्या पध्दतीने त्रास देण्याची गरज नसल्याचे ॲड. मळवीकर यांनी सांगितले. 

           हलकर्णी ग्रामपंचायत विरुद्ध दौलत-अथर्व कारखाना संघर्ष

           दौलत कारखान्याकडून हलकर्णी ग्रा. पं. ला करापोटी ७१ लाख रूपये येणे आहे. अथर्व कंपनी आपल्या कालावधीतील करारानुसार देय असलेली रक्कम देण्यास तयार आहे. परंतू थकीत सर्व रक्कम अथर्व देय लागते. असा समज हलकर्णी ग्रामपंचायतीचा असल्याने थकीत रक्कम वसूलीसाठी ग्रामपंचायत न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे. यावरून अथर्व व ग्रामपंचायत वाद विकोपाला गेला आहे. या प्रकरणी गळीत हंगाम कार्यक्रमात ॲड. संतोष मळवीकर यांनी सरपंच राहुल गावडे यांच्यावर तोफ डागली होती. त्यानंतर हलकर्णी ग्रामसभेत मळवीकरांचा निषेध नोंदवला होता.

No comments:

Post a Comment