'बारी' वरील 'सबूद' महानाट्याचा मुहूर्त डोंबिवली येथे दिमाखात - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2021

'बारी' वरील 'सबूद' महानाट्याचा मुहूर्त डोंबिवली येथे दिमाखात

डोंबिवली येथे `सबूद` नाटक मुहूर्त प्रसंगी उपस्थित मान्यवर.

कालकुंद्री : प्रतिनिधी

           'ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोवाड' संचलित व 'नाट्यसंस्कार' मंडळ मुंबई निर्मित पद्मश्री, स्वामीकार 'रणजीत देसाई' यांच्या गाजलेल्या 'बारी' कादंबरीवर आधारित 'सबूद' या दोन अंकी महानाट्याचा मुहूर्त स्वामी विवेकानंद प्रशाला डोंबिवली (मुंबई) येथे दिमाखात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध उद्योजक सत्तुराम मा. मणगुतकर हे होते.
   चंदगडी मातीत घडलेले पण सध्या मुंबई व उपनगरात नोकरी- व्यवसायानिमित्त स्थायिक असलेले निर्माता, दिग्दर्शक व कलाकार या महानाट्य निर्मितीत योगदान देण्यासाठी सज्ज झाले आहेत. मागील आठवड्यात झालेल्या ऑडिशन्स तथा पात्र निवड प्रक्रियेला महाराष्ट्रसह कर्नाटकातील कलाकारांनीही हजेरी लावली होती. तथापि आधी ठरल्याप्रमाणे 'चंदगडी' कलाकारांचीच निवड करण्यात आली. या नाट्यकृती साठी लागणारे आर्थिक सहाय्य उद्योजक सत्तूराम मनगुतकर यांनी आपली दिवंगत पत्नी सिंधू यांच्या स्मरणार्थ देण्याची यावेळी घोषणा केल्याने या नाट्यकृती निर्मितीला बळ प्राप्त झाले आहे. 
          स्वागत दिग्दर्शक जीवन कुंभार यांनी केले. निर्माता शिवाजी विष्णू पाटील यांनी प्रास्ताविकात नाटकाची संकल्पना विशद केली. यावेळी सुप्रसिद्ध नेपथ्यकार प्रकाश लाड, कलाशृंगारचे निर्माते अशोक कातकर, 'सबूद' नाट्यलेखक सन्ना मोरे यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले. सहनिर्माता संजय कृ. पाटील यांनीही अर्थसहाय्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी कोल्हापूर रहिवासी संघटना बदलापूरचे संपर्कप्रमुख गोपाळ मनगुतकर, कृष्णा बामणे, विष्णू पाटील यांचेसह चंदगड व नजीकच्या तालुक्यातील मुंबईस्थित कलाकार मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. यावेळी रणजित देसाई यांच्या कन्या पारू नाईक, मधुमती शिंदे, गौरव नाईक कुटुंबीयांनी शुभेच्छा दिल्या.नाट्यसंस्कार मंडळाचे सदस्य महादेव प. पाटील, शिवाजी द. पाटील, दयानंद सरवनकर यांनी कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सबूद' चा पहिला प्रयोग चंदगड तालुक्यातच होणार असून डिसेंबर महिन्यात तारीख व ठिकाण घोषित करण्यात येईल. अशी माहिती दिग्दर्शक जीवन कुंभार यांनी दिली. आभार सहनिर्माता संजय पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment