२५ नोव्हेंबर : सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांचा स्मृतिदिन अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून पाळणार - चंदगड लाईव्ह न्युज

13 November 2021

२५ नोव्हेंबर : सर्पमित्र कै. बाबुराव टक्केकर यांचा स्मृतिदिन अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून पाळणार

आद्य सर्पमित्र बाबुराव टक्केकर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      चंदगड तालुक्यात पुरोगामी विचारसरणीचा वारसा जतन करण्याबरोबरच तो वाढविण्यासाठी आयुष्यभर धडपड करणारे आद्य सर्पमित्र कै बाबुराव ओमाना टक्केकर (ढोलगरवाडी, ता. चंदगड) यांचा २५ नोव्हेंबर २०२१ रोजी स्मृतिदिन आहे. हा दिवस अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून पाळण्याचा निर्णय सत्यशोधक वाघमारे सट्टूप्पा टक्केकर जुनियर कॉलेज व मामासाहेब लाड विद्यालय तसेच टक्केकर, वाघमारे कुटुंबीय ढोलगरवाडी यांच्या वतीने घेण्यात आला आहे.

        सुमारे साठ वर्षांपूर्वी कै टक्केकर यांनी ढोलगरवाडी येथे शेतकरी शिक्षण मंडळ व मामासाहेब लाड विद्यालय स्थापन केले. पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या सापाचे संवर्धन झाले पाहिजे या उद्देशाने त्यांनी या ठिकाणी देशातील पहिली सर्प शाळा सुरू केली. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे पाईक म्हणून वावरताना समाजातील अंधश्रद्धा, अंध रूढी-परंपरा यांना तिलांजली देण्याचे कार्य त्यांनी आपल्या जीवन शैलीतून दाखवून दिले आहे. 

     त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक जाणीव ठेवून हा वारसा पुढे चालवण्यासाठी तालुका व परिसरातील शिक्षणप्रेमी, सर्पमित्र, समाजसेवक, पुरोगामी विचारसरणीचे मित्रमंडळी, नातेवाईक, ग्रामस्थ यांनी मामासाहेब लाड विद्यालय ढोलगरवाडी येथे २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे. असे आवाहन शेतकरी शिक्षण मंडळ ढोलगरवाडी, गौराबाई शिक्षण संस्था कोलिक यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment