बँक ऑफ महाराष्ट्र मधील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची कुचंबणा कोवाड शाखेत अजून तीन कर्मचाऱ्यांची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

05 December 2021

बँक ऑफ महाराष्ट्र मधील अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची कुचंबणा कोवाड शाखेत अजून तीन कर्मचाऱ्यांची गरज

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाडच्या शाखाधिकाऱ्यांना निवेदन देताना व्यापारी संघटना पदाधिकारी व ग्राहक

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कोवाड (ता. चंदगड) येथे अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची कुचंबणा होत आहे. ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अजून तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक तात्काळ करावी अशी मागणी येथील व्यापारी संघटना व ग्राहकांनी केली आहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बँकेत होत असलेली ग्राहकांची गर्दी.
          मागील महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या ८७ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवर झालेल्या कॅम्पेनिंग मध्ये ६११ शाखा सहभागी झाल्या होत्या. यात कोवाड शाखेने देशात दुसरा क्रमांक पटकावला होता. स्पर्धेच्या निमित्ताने शाखेने ग्राहकाभिमुख सेवा देऊन गुणवत्ता व दर्जा सिद्ध केला असला तरी मागील महिन्यात कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या नंतर त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आहेत त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडण्याबरोबरच बँकेच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असून याचा नाहक त्रास ग्राहकांना सोसावा लागत आहे. सद्यस्थितीत कोवाड मधील सुमारे पाचशे व्यापारी, पन्नास गावातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व शिक्षकांच्या पगाराबरोबरच हजारो ग्राहकांची खाती या बँकेत आहेत. शाखेची उलाढाल लक्षात घेता येथे अजून तीन कर्मचार्‍यांची आवश्यकता आहे. या कर्मचाऱ्यांची भरती बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने तात्काळ करावे अशा मागणीचे निवेदन कोवाड येथील व्यापारी संघटना व ग्राहकांनी नुकतीच शाखा अधिकाऱ्यांना दिले यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद सलाम, उपाध्यक्ष कल्लाप्पा वांद्रे, सदस्य चंद्रकांत कुंभार, सचीन पाटील, जगदिश अंगडी, दयानंद लांडे, विक्रम पेडणेकर, हणमंत पाटील आदींसह व्यापारी व ग्राहक उपस्थित होते. 

1 comment:

Unknown said...

I will be interested

Post a Comment