श्री ब्रम्हलिंग मंदिर वास्तूशांती, कळसारोहण व सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महात्सावची रोवली मुहुर्तमेढ, तुर्केवाडी येथे होणाऱ्या सात दिवसांचा भक्तीमय उत्सवाची फडकली पताका - चंदगड लाईव्ह न्युज

13 December 2021

श्री ब्रम्हलिंग मंदिर वास्तूशांती, कळसारोहण व सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महात्सावची रोवली मुहुर्तमेढ, तुर्केवाडी येथे होणाऱ्या सात दिवसांचा भक्तीमय उत्सवाची फडकली पताका

मुहुर्तमेढ रोवताना वारकरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील श्री ब्रम्हलिंग मंदिर वास्तूशांती आणि सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सवाची सोमवारी डॉ. विश्वनाथ पाटील महाराज यांच्या करवी गावातील ज्येष्ठ ग्रामस्त मारुती लक्ष्मण बसर्गेकर यांच्या हस्ते मुहुर्तमेढ रोवण्यात आली. २५ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या सात दिवसाच्या महोत्सवाची पताका आज फडकवण्यात आली. या कार्यक्रमासाठी तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, यशवंतनगर तसेच वैताकवाडी गावातील ज्येष्ठ नागरीक, वारकरी मंडळींना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. यावेळी वैताकवाडी गावातील वैजू गावडे, परशराम पाटील, मुरकुटेवाडीतील मारुती मुरकुटे, अशोक चव्हाण, शंकर चव्हाण, तर यशवंतनगर येथील महादेव मर्डेकर, नारायण पवार आदी ज्येष्ठ मंडळींसह श्री ब्रम्हलिंग मंदिर महोत्सव समिती, जिर्णोद्धार समिती, श्री सोपानदेव भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ तसेच सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व समाजाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

         तुर्केवाडी पंचक्रोशीतील गावांचे ग्रामदैवत असलेल्या ब्रम्हलिंग मंदिराचा वास्तूशांती व कळसारोहण प.पु. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी (हुक्केरी) यांच्या हस्ते होणार आहे. तर श्री सोपानदेव पुण्यतिथी सप्ताहाचा शताब्दी महोत्सव महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार व प्रवचनकारांच्या प्रमुख उपस्थितीत २५ डिसेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ या दरम्यान होणार आहे.

              श्री ब्रम्हलिंग देवालय वास्तूशांती व कळसारोहण समारंभ

          या महोत्सवादरम्यान, शनिवारी (२५ डिसेंबर २०२१ रोजी) ग्रामदैवत श्री ब्रम्हलिंग देवाचा मुखवटा व कळस मिरवणूक वैताकवाडी, यशवंतनगर, मुरकुटेवाडी करत तुर्केवाडी गावामधून मंदिरापर्यंत मिरवणूकीने आणला जाणार आहे. तर दुरऱ्या दिवशी रविवारी (दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी) वास्तूशांतीसह होम हवन केले जाणार आहे. सोमवारी (दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी) हुक्केरी मठाचे प.पु. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांच्या शुभहस्ते कळसारोहण होणार आहे. यावेळी तालुक्यासाह जिल्ह्यातील वारकरी संप्रदाय, प्रमुख राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी व नागरिक उपस्थित राहणार आहेत.

                श्री सोपानदेव पुण्यतिथी शताब्दी महोत्सव

            तुर्केवाडी गावातील ह.भ.प वै.भरमाणा लक्ष्मण चौगुले यांची सुरु केलेला श्री सोपानदेव पुण्यतिथी महोत्सवाचे हे १००वे वर्ष असून हा शताब्दी महोत्सव व श्री ब्रम्हलिंग देवायल वास्तूशांती व कळसारोहण असा संयुक्त महोत्सव पार पडत असून सोमवारी (दि. २७ डिसेंबर २०२१ रोजी) ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा प्रारंभ होणार आहे. तर पुढील पाच दिवस २ जानेवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार ह.भ.प. गोपाळआण्णा वास्कर महाराज, ह.भ.प पांडुरंग घुले महाराज, ह.भ.प. जयवं बोधले महाराज, ह.भ.प. केशव उखळीकर महाराज, ह.भ.प. योगिराज गोसावी महाराज, चैतन्य देगलुरकर महारज यांचे निरुपण होणार आहे. या दरम्यान, शनिवारी (दि. १ जानेवारी रोजी) पुष्पवृष्टी संपन्न होणार आहे. तर या महोत्सवाचे विशेष आकर्षण असलेल्या माऊली अश्वरिंगण सोहळा रविवारी (दि. २ जानेवारी २०२२ रोजी) होणार असून महाप्रसादाने या संपूर्ण सोहळ्याची सांगता होणार आहे.

No comments:

Post a Comment