शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव यंदा महागावात, 'संत गजानन'ला यजमानपद, तीन हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2021

शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव यंदा महागावात, 'संत गजानन'ला यजमानपद, तीन हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

संत गजानन महाविद्यालय.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           शिवाजी विद्यापीठाचा या वर्षीचा मध्यवर्ती युवा महोत्सव महागाव  (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात (दि. 27, 28 व 29 डिसेंबर) रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील तीन हजारहून अधिक विद्यार्थी उपस्थिती राहणार आहेत. प्रथमच या विभागात युवा महोत्सव यजमानपदाचा मान या महाविद्यालयाला मिळाला आहे. विद्यापीठ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे युवा महोत्सव ऑनलाइन झाला होता. या वर्षी मात्र कोरोना नियमाचे पालन करीत महोत्सव एकत्रीतपणे रंगमंचावर होणार असल्यामुळे युवा वर्गात जल्लोष आणि आनंदाला उधाण आला आहे.

             सोमवार (दि. 27) रोजी सकाळी दहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्‍हणून गोकुळचे संचालक शशिकांत पाटील-चुयेकर व गटविकास अधिकारी शरद मगर हे उपस्थित राहणार आहेत.                                या महोत्सवात ३२ कलाप्रकारचा समावेश असणार आहे. यामध्ये सांघिक व वैयक्तिक असे दोन प्रकारात लोकनृत्य, लोककला, एकांकिका, पथनाट्य, समुहगीत, वाद-विवाद, प्रश्नमंजुषा, नकला, एकपात्री अभिनय, चित्रकला, छायाचित्र,वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.                                                     बुधवार (दि. 29) रोजी समारोप समारंभासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, गोकुळचे संचालक अजित नरके, मराठी मालिका अभिनेता लागीर झालं जी फेम राहुल मगदूम उपस्थित राहणार आहेत. महोत्सव यशस्वी होण्यासाठी महाविद्यालय व प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत व संयोजन समिती सचिव प्रा. व्ही. एम. पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment