तिलारीनगर येथील मत्स्यबीज केंद्रात गेलेल्या जमिनी परत द्या - शेतकऱ्यांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2021

तिलारीनगर येथील मत्स्यबीज केंद्रात गेलेल्या जमिनी परत द्या - शेतकऱ्यांची मागणी

 

तिलारीनगर (ता. चंदगड) येथे मत्स्यबीज केंद्रात गेलेल्या जमिनी परत मिळाव्यात या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देताना शेतकरी

चंदगड/प्रतिनिधी

तिलारीनगर  (ता.चंदगड) येथे गेली ३२ वर्षे आवस्थेत असलेल्या मत्स्यबीज केंद्रात गेलेल्या जमिनी परत द्या, अशी मागणी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

       तिलारी येथील मत्स्यबीज प्रकल्पासाठी शासनाने जमिनी संपादित करुन  ३२ वर्ष झाली.पण मत्स्यबीज प्रकल्प बंद स्थितीत आहे. या प्रकल्पासाठी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने भूमीहीन झालेल्या या शेतकऱ्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळाला नाही.  जिल्हाधिकारी राहुल रेखावार काल चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता मत्स्यबीज केंद्राच्या प्रवेशद्वारावर संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची गाडी रोखून धरली,व आमच्या जमीनी परत करव्यात अशी आग्रही मागणी केली. तब्बल तासभर रास्ता रोको करून संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय न दिल्यास २६ जानेवारी २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनातून  शेतकऱ्यांनी दिला आहे.

      यावेळी ज्ञानेश्वर दळवी, जयश्री शिवाजी दळवी, रामा बडकू गोंडे, जनाबाई विठ्ठल गोंडे, सट्टू चांगू गोंडे, लक्ष्मण चांगू गोंडे, कृष्णा दळवी, अंकुश नारायण दळवी, गुंडू दळवी, जनाबाई गोंडे, गुणवंती बडकु गवस, चांगु गवस आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment