किल्ले पारगडचा निसर्गरम्य परिसर |
कालकुंद्री : श्रीकांत पाटील /सी. एल. वृत्तसेवा
निसर्ग पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग संवर्धन, लोक प्रबोधनासाठी पारगड हेरिटेज रन (अर्ध मॅरेथॉन स्पर्धा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. किल्ले पारगड जनकल्याण संस्था, पारगड, मिरवेल, नामखोल ग्रुप ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व ३० जानेवारी २०२२ रोजी होणारी स्पर्धा जिल्हा राज्य व देशभरातील धावपटूंसाठी पर्वणी, आव्हान शिवाय छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावरून स्पर्धेत सहभागी होण्याचा रोमांचकारी अनुभव ठरणार आहे.
किल्ले पारगड |
स्पर्धा जॉय ऑफ जंगल (५ किमी), जंगल ड्रीम रन (१० किमी) व जंगल हाफ मॅराथॉन (२१ किमी) धावणे अशा तीन श्रेणीमध्ये आहे. पारगड हेरिटेज रन 'निसर्गाचे रक्षक' मोहिमेअंतर्गत नैसर्गिक संवर्धन, वृक्ष लागवड, पाणी संवर्धन, कचऱ्याचे पुनर्विनीकरण, नैसर्गिक ऊर्जा कार्यक्षमता या पाच उद्दिष्टांवर प्रबोधन करणार आहे.
स्पर्धा वेळापत्रक पुढील प्रमाणे- २९ जानेवारी २०२२ सायं. ४ पर्यंत स्पर्धकांचे आगमन, ५ वाजता कार्यक्रमाची संक्षिप्त माहिती, ६ वाजता सांस्कृतीक कार्यक्रम, सायं. ७ वा. 'निसर्गाचे रक्षक' लोकप्रबोधन, रात्री ८ वाजता निसर्गसंवर्धन चर्चासत्र, ९ वाजता रात्रीचे जेवण. ३० जानेवारी सकाळी ५ वाजता अल्पोपहार, ५.३० वाजता उद्घाटन समारंभ, ६ वाजता स्पर्धेची सुरुवात, ९ वाजता पारितोषिक वितरण व मान्यवरांचे मार्गदर्शन, १० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम असे नियोजन आहे. येणाऱ्या स्पर्धकांच्या राहण्याची सोय निसर्ग सानिध्यात तात्पुरत्या तंबूत करण्यात येणार आहे. ३० जानेवारी रोजी पहाटे तीन वाजता चंदगड आगारातून पारगड पर्यंत बसची सुविधा उपलब्ध असून परतीच्या प्रवासासाठी चंदगड पर्यंत राहिल. ही बस चंदगड ते पारगड ३२ किमी अंतरातील सर्व थांब्यावर थांबेल.
स्पर्धा मार्गावर रुग्णवाहिका, वैद्यकीय सुविधा, रेस मार्शलच्या नजरेखालील चेक पॉईंट, पिण्याचे पाणी व केळी आदी सुविधा राहणार आहेत. स्पर्धेसाठी संबंधित शासकीय विभागांचे सहकार्य लाभणार आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये, क्रीडा मंडळ, क्रीडा प्रशिक्षण केंद्रे व संस्थांतील तीन निवडक विद्यार्थी, स्पर्धकांना स्पर्धेत विनामूल्य प्रवेश असून त्यापेक्षा अधिक स्पर्धकांसाठी प्रवेश शुल्क लागू राहील. शारीरिक शिक्षकांनी निवडक स्पर्धकांचे फार्म outplaysportsfoundation@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत. असे आवाहन स्पर्धा प्रमुख प्रवीण चिरमुरे व किल्ले पारगड जनकल्याण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment