'बारी' कादंबरीवर आधारित दोन अंकी 'सबुद' महानाट्याची तयारी डोंबिवली येथे जोरात - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2022

'बारी' कादंबरीवर आधारित दोन अंकी 'सबुद' महानाट्याची तयारी डोंबिवली येथे जोरात


कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा

         चंदगड तालुक्यातील रसिकांना प्रतीक्षेतील 'सबुद' महानाट्याची सध्या डोंबिवली येथे जोरदार तयारी सुरू आहे. ज्येष्ठ साहित्यिक स्व. रणजित देसाई लिखित 'बारी' कादंबरीवर आधारित या दोन अंकी महानाट्याची रणजित देसाई यांच्या साहित्यावर प्रेम करणारे वाचक व मराठी नाट्य रसिक मोठ्या आतुरतेने वाट पाहात आहेत. कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यास येत्या दोन महिन्यात चंदगड तालुक्यात या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे. चंदगड तालुक्यातील नाट्यरसिकांसह बारी कादंबरीच्या वाचकांना या नाटकाबद्दल अधिकच कुतूहल निर्माण झाले आहे. 
डोंबिवली येथे 'सबुद' महानाट्य रंगीत तालीम प्रसंगीचा एक क्षण.

       चंदगड तालुका व परिसरातील मुंबईस्थित चाकरमानी कलाकारांनी स्थापन केलेल्या 'नाट्यसंस्कार' संस्थेच्या वतीने नाटकाची निर्मिती सुरू असून यातील सर्व कलाकार हे कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे परिसरातील असले तरी ते मूळचे 'चंदगडी' च आहेत. सध्या डोंबिवली येथे नाटकाच्या तालमी सुरू असून यात महादेव पाटील, दयानंद सरवणकर, अमोल पाटील, शिवाजी वि. पाटील, शिवाजी द. पाटील, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, जकनू मुरकुटे, सुनील लोंडे, बामणे, सुप्रिया गावकर, साक्षी घाणेकर, विलक्षणा मोरे, धनश्री मणगुतकर, सुवर्णा व बालकलाकार संस्कृती कुंभार हे चंदगड तालुक्यातील विविध गावचे कलाकार जीवन कुंभार यांच्या दिग्दर्शनाखाली आपले अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
              उद्योजक सत्तूराम मा. मणगुतकर (स्मृतिगंध) हे पुरस्कर्ते असून आपल्या दिवंगत पत्नी सिंधू यांच्या स्मरणार्थ अर्थसहाय्य उभे केले आहे. नाट्यलेखन सन्ना मोरे, निर्माता, शिवाजी वि. पाटील व संजय पाटील, नेपथ्य प्रकाश लाड, संगीत आनंद कुबल यांचे आहे. निर्मितीसाठी ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोवाड यांचेही सहकार्य लाभत आहे.

No comments:

Post a Comment