अथर्व संचलित दौलत साखर कारखाना वजन काट्याची भरारी पथकाकडून तपासणी, वजनकाटे निर्दोष, पथकाचा निर्वाळा - चंदगड लाईव्ह न्युज

18 January 2022

अथर्व संचलित दौलत साखर कारखाना वजन काट्याची भरारी पथकाकडून तपासणी, वजनकाटे निर्दोष, पथकाचा निर्वाळा

दौलत कारखान्याचे संग्रहित छायाचित्र


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
        हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व इंटरट्रेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा २०२१-२२ हा तिसरा गळीत हंगाम सुरु आहे. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे आदेशानुसार आज दिनांक १८ जानेवारी २०२२ रोजी आर. एन. गायकवाड (उपनियंत्रक, वैद्यमापन शास्त्र, कोल्हापूर) यांचे भरारी पथकाने काल कारखान्यावरील वजन काट्याना अचानक भेट देवून वजन काटयाची तपासणी केली. यामध्ये ऊस भरुन आलेल्या ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी व इतर वाहनाची दु. २ ते ५ वाजेपर्यंत तीन तास तंतोतंत तपासणी करण्यात आली. वाहनाची पुन्हा एकदा वजन काटयावर भरलेली व रिकामी अशी तपासणी केली. तसेच बिडाच्या वजनाचीही चाचणी घेणेत आली. तीही बरोबर व योग्य असल्याचे निदर्शनास आहे. सदरच्या तपासणीमध्ये अथर्व इंटरटेड प्रा. लिमिटेड लिज्ड युनिट दौलत साखर कारखान्याचा वजन काटा बिनचुक व निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. तसेच काही शेतकऱ्यांनाही बोलावून त्यांच्या समक्ष वजनाची खात्री करणेत आली. याबाबत या शेतकऱ्यांचेही जबाब नोंदविणेत आले.
         अथर्व इंटरट्रेड कंपनीने सन २०१९-२०  पासून कारखाना चालविणेस घेतला. या कारखान्याच्या वजनाकाटयाबाबत विश्वासार्हता टिकवून ठेवली असून कारखान्याला ऊस पुरवठा करणारा शेतकरी समाधानी व आनंदी आहे. आजअखेरच्या तिसऱ्या गळीत हंगामापर्यंत कारखाना व्यवस्थापनाने आपल्या या कारखान्याची चांगली विश्वासार्हता निर्माण केली आहे. यापुढेही ही विश्वासार्हता कायम राहणार असून शेतकऱ्यांच्या मालाचे निश्चित वजन व चांगला भाव देणार आहोत असे अथर्व चेअरमन अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी सांगितले. 
         वजन काटा निर्दोष ही बाब कारखाना व्यवस्थापनाच्यादृष्टीने अभिमानाची आहे. यामुळेच कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकरी या कारखान्यास ऊस घालणेस नेहमीच उत्सुक राहतात. दिवसेदिवस कारखान्याची विश्वासार्हता वाढत असून कारखान्याबाबत एक आपूलकीचे व जिव्हाळयाचे नाते कारखाना परिसरात निर्माण झाले आहे. या सदभावना कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने उपयोगी येवून भविष्यात याची चांगला लाभ स्थानिक शेतकऱ्यांना होईल यात शंका नाही. कारखान्याने वेळेत ऊस उचल व प्रती पंधरवडा वेळचेवेळी ऊस पेमेंट करुन शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. या भरारी पथकामध्ये  आर. एन. गायकवाड (उपनियंत्रक वैद्यमापन शास्त्र, कोल्हापूर), एस. पी. सोनवणे ( विशेष लेखा परिक्षक, सह संस्था (साखर) कोल्हापूर), एम. डी. पाटील ( निरीक्षक, वैदयमापन शास्त्र, गडहिंग्लज), तहसिल कार्यालय चंदगडचे प्रतिनिधी इकबाल तांबोळे, हवालदार जमीर मकानदार आदीचा या पथकात  समावेश होता. भरारी पथकाने तपासणीअंती समाधान व्यक्त करून वजन काटे निर्दोष असलेचे कारखान्याला प्रमाणपत्र दिले. या तपासणीवेळी युनिट हेड धनंजय जगताप, सेक्रेटरी अनिल काटे, शेती अधिकारी सदाशिव गदळे, केनयार्ड सुपरवायझर पी. डी. सरवदे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment