तडशिनहाळ (ता. चंदगड) शाळेत वार्षिक शाळा तपासणी प्रसंगी पथकासमवेत गटशिक्षणाधिकारी सौ. सुभेदार. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
शिक्षण विभागात सध्या वार्षिक शाळा तपासणी (इन्स्पेक्शन) ची लगबग सुरू आहे. विद्यार्थी उपस्थिती, अभ्यासक्रमाची झालेली अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची विषयवार प्रगती, वर्ग व विद्यार्थी संबंधित तसेच शालेय रेकॉर्डची अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केली जाते. तपासणी पथकात शक्यतो पुरुष अधिकाऱ्यांची संख्याच अधिक असते हा आजपर्यंतचा अनुभव आहे. तथापि चंदगड तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सौ. एस. एस. सुभेदार यांनी कार्वे केंद्रातील शाळांची तपासणी करण्यासाठी शंभर टक्के महिलांचे तपासणी पथक तयार करून वेगळा उपक्रम सुरू केला आहे.
शासकीय व जिल्हा परिषदेच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सौ सुभेदार यांना नुकतेच कोल्हापूर जीप. मार्फत राजश्री शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. स्वतः एक महिला अधिकारी असल्यामुळे एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून तालुक्यातील एका केंद्रातील सर्व शाळांची वार्षिक तपासणी महिला अधिकारी, मुख्याध्यापिका, अध्यापिका यांच्या पथकामार्फत घेण्याचे ठरविले. त्याची अंमलबजावणी कार्वे केंद्रातील विद्या मंदिर तडसीनहाळ शाळेतून सुरू केली. गटशिक्षणाधिकारी सौ सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी पथकात पथक प्रमुख मुख्याध्यापिका अर्चना शिंदे यांच्यासह अलका तानाजी पाटील, संगीता महेश जळगेकर, शीतल सुनील पाटील, विद्या मधुकर कदम, चंदा कृष्णा घसारी, रूपा राजेंद्र बैलूर, मीना म. लोबो यांचा समावेश आहे. शाळांच्या वार्षिक तपासणीतही आता महिलाराज आल्याचा उपक्रम मात्र शैक्षणिक वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.
No comments:
Post a Comment