कोवाड / सी. एल. वृत्तसेवा
कोवाड दूरक्षेत्रात पूर्ण क्षमतेने पोलिस कर्मचारी नसल्याने या भागात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे . ५२ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस दूरक्षेत्राचा कारभार केवळ तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर सुरू असल्याने अवैध धंदे फोफावत आहेत . पोलिस विभागाने तातडीने येथे रिक्त असलेले पोलिस अधिकारी पद भरून कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आणावी , अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा . दीपक पाटील यांनी जिल्हा पोलिस प्रमुखांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे .
निवेदनात म्हटले आहे ,कोवाड दूरक्षेत्रांतर्गत ५२ गावांतील
जवळपास ७६ हजार लोकसंख्येचा समावेश होतो . तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येची गावे या परिसरात आहेत . कोवाड , कुदनूर , माणगाव येथे बाजारपेठा आहेत . तसेच आठ ते दहा किलोमीटर अंतरावर कर्नाटकची हद्द आहे . त्यामुळे येथील दूरक्षेत्रात एक पोलिस उपनिरीक्षक व तीन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती . पण गेल्या दोन वर्षांपासून तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांची अन्यत्र बदली झाल्यानंतर हे पद रिक्त आहे . केवळ तीन पोलिस कर्मचारी काम पाहत आहेत . त्यातील एका कर्मचाऱ्याची सतत चंदगडला ट्यूटी असते . त्यामुळे पोलिसांची अवैध व्यवसायावरील पकड ढिली होत आहे . पोलिस चौकी असूनही काही वेळा छोट्या मोठ्या वादाच्या प्रसंगासाठी या भागातील लोकांना ४० किलोमीटर अंतर पार करुन चंदगडला जावे लागते . त्यामुळे कोवाड पोलिस दूरक्षेत्रात कायमस्वरूपी पोलिस उपनिरीक्षकाची नियुक्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा.
No comments:
Post a Comment