शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन महाविकास आघाडी सरकार सन्मान वाढवणार का? - चंदगड लाईव्ह न्युज

04 February 2022

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन महाविकास आघाडी सरकार सन्मान वाढवणार का?

 


चंदगड / सी. एल  वृत्तसेवा

        प्रामाणिक शेतकऱ्यांनी सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्जफेड केली. पण दोन वर्ष झाली तरी अद्याप नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या महात्मा फुले प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही.  या योजनेतील ४० लाख शेतकरी  प्रोत्साहनपर  अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.  मात्र जवळपास दोन वर्ष झाली तरी  कर्जफेड केलेल्या प्रामाणिक शेतकऱ्यांना सरकारने ऑक्सिजनवर ठेवले आहे. 

          राज्यात आघाडी सरकार  सत्तेवर आल्यानंतर सरकारने दोन लाखापर्यंत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना आणली. या योजनेअंतर्गत राज्यातील कर्ज घेतलेल्या एकूण ८९ लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल ४९ लाख शेतकरी या कर्जमाफीला पात्र ठरले, तर उर्वरित ४० लाख शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या योजनेतून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु जवळपास दोन वर्ष उलटली तरी त्यांची ही घोषणाच राहिली आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रोत्साहन अनुदान मिळणार या आशेने आपले  दागिने गहाण ठेवून कर्जाची परतफेड केली आहे. मात्र प्रोत्साहन अनुदान दूरच असून शेतकऱ्यांना मात्र कर्जापोटी गहाण ठेवलेल्या सोनेतारण कर्जाचे हप्ते भरावे लागत आहेत. निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अनेक मंत्री अनुदान देणार अशा घोषणा करत आहेत. मात्र या घोषणा केवळ घोषणाच आहेत. त्यामुळे दोन वर्ष  उलटूनही शेतकरी प्रोत्साहन अनुदानाकडे डोळे लावून बसले आहेत. बुडव्यांना लाभ आणि प्रामाणिक शेतकयांना ठेंगा अशी सरकारची धारणा आहे काय? असा प्रश्न या शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख १८ हजार १८ ९ शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यापैकी १ लाख ९ २ हजार शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत. तर इतर बँकांचे २६ हजार ११९ शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान न मिळाल्यास या १४६४ कोटीवर पाणी पडणार आहे.




No comments:

Post a Comment