निवडणूकीच्या तोंडावर येणाऱ्यांना गावच्या वेशीबाहेर ठेवा - आमदार राजेश पाटील, कोवाड विभागात ७० लाखांच्या कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

निवडणूकीच्या तोंडावर येणाऱ्यांना गावच्या वेशीबाहेर ठेवा - आमदार राजेश पाटील, कोवाड विभागात ७० लाखांच्या कामांचा शुभारंभ

राजगोळी खुर्द येथे विकास कामांचा भुभारंभ करताना आमदार राजेश पाटील उपस्थित मल्लीकार्जून मुगेरी व ग्रामस्थ
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड तालुक्यात निवडणूका जवळ आल्या की अनेकजन विविध प्रलोभने घेऊन जनतेसमोर येतात. निवडणूकीच्या तोंडावर येणाऱ्या सोंग्या-ढोंग्याना गावच्या वेशी बाहेर ठेवून विकास कामे करणाऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे आवाहन चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी केले.

    किणी -कर्यात कोवाड (ता. चंदगड) भागातील विविध गावात आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून जवळपास ७० लाख रुपयांच्या कामांचे उद्घाटन आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजगोळी (ता. चंदगड) येथे आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते.

           आमदार राजेश पाटील पुढे बोलताना म्हणाले, ``मी राजकारण करणारा कार्यकर्ता नसून समाजकारण करणारा कार्यकर्ता आहे. मी आम जनतेचा प्रतिनिधी असल्याने जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझे आद्य कर्तव्य आहे. चंदगड मतदार संघाच्या विकासासाठी मी कटीबद्ध असून तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला विकास देतो. कोरोणाच्या महामारीतही मतदार संघात २०० कोटींची कामे आणली. मतदार संघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून १४ रूग्णवाहीका व मी स्वतः २ रूग्णवाहीका दिल्या आहेत. पाटणे फाटा येथे ५० खाटांचे ग्रामिण रुग्णांलय व २० खाटांचे ट्रॉमा सेंटरचे काम  लवकरच चालू होणार आहे. तर शिनोळी येथे शिवाजी विद्यापिठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. विकास कामासाठी मागे राहणारा कार्यकर्ता नसून तुम्ही आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी पैशेवाल्यांच्या, भूलथापा  देणाऱ्याच्या पाठीशी न राहता राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले 

          यावेळी दिंडलकोप, राजगोळी, तळगुळी, नरगट्टे, तिरमाळ, चन्नेटी, यर्तनहट्टी, कामेवाडी, किटवाड, चिंचणे आदि गावामध्ये ७० लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

           प्रास्ताविक सरपंच मावळेश्वर कुंभार यांनी केले. यावेळी उपसरपंच शिवपुत्र कोळीद्रे, माजी जि. प. सदस्य मल्लीकार्जुन मुगेरी, सदस्य सुनिल मोरे, धोंडिबा तोंडले, लक्ष्मण कडोलकर, नारायण कडोलकर, भावकाना ढवळे, देवजी कांबळे, पं. स. माजी उपसभापती बंडू चिगरे, तालूका संघाचे व्हा. चेअरमन पोमाणा पाटील, कोवाडचे माजी उपसरपंच विष्णू आढाव, एस. एल. पाटील, सुर्यकांत पाटील, रजाक सनदी, पी. बी. पाटील, नामदेव कोकितकर, दत्तात्रय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment