बसर्गे येथे बांधण्यात आलेल्या विद्या संकुलनाच्या उद्घाटन करताना सतेज पाटील. |
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील अनेक प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. यामध्ये हलकर्णी औद्योगिक वसाहत, पोलीस ठाणे पर्यटन विकास, रस्ते यांचा समावेश आहे. यासाठी काही दिवसांत प्रशासकीय अधिकारी, तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी यांना एकत्र बोलावून तालुक्यातील प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ते बसर्गे येथे बांधण्यात आलेल्या विद्या संकुलनाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री भरमुअण्णां पाटील होते.प्रास्ताविक विलास पाटील यांनी केले तर स्वागत कल्लाप्पा भोगण यांनी केले. यावेळी विलास पाटील यांनी आपल्या वडिलांचे शाळेचे स्वप्न पूर्ण केले असल्याचे समाधान व्यक्त केले.भोगण यांनी पद सार्थकी लागले असल्याचे सांगितले.
सतेज पाटील पुढे म्हणाले शाळा, ग्रामपंचायत सेवा संस्था या गावाचा छफअभिमान असतात. यावरच गावचे वैभव दिसून येते.तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे असे सांगितले. तर शाहू महाराज जयंती निमित्त कृतज्ञता पर्व उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये जिल्ह्यातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आम. राजेश पाटील म्हणाले तालुक्याच्या क्षेत्रफळाच्या विचार करता पालकमंत्र्यांनी आणखी २०० कोटीचा वाढीव निधी चंदगडला वर्ग करावा,तसेच या ठिकाणी आणखी एक पोलीस ठाणे मंजूर करून येथील अवैध धंदे आटोक्यात आणण्यासाठी हे गरजेचं आहे. हलकर्णी औद्योगिक वसाहतीत ट्रामा केअर सेंटरचे काम लवकर सुरू व्हावे. मत्स्यबीज व्यवसायासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.
तर भरमुअण्णां पाटील यांनी आपल्या काळात तालुक्यात अनेक धरणे, तलाव मंजूर केले त्यामुळे तालुक्यात पंधरा लाख टनाहून अधिक ऊस पिकतो असे सांगत तालुक्याच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ग्वाही दिली.
गोपाळराव पाटील यांनी विद्या पाटील व कल्लाप्पा भोगण यांनी ८०कोटी निधी तालुक्यात आणला असल्याचे सांगितले. अपुऱ्या कामासाठी निधी उपलब्ध करून तालुक्याचे पालकत्व सतेज पाटील यांनी स्वीकारावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर तालुक्याला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून हलकर्णी औद्योगिक वसाहतीत उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले. तर ज्ञान मंदिरेच तालुक्याचे, देशाचे वैभव असल्याचे संग्राम कुप्पेकर यांनी सांगितले.
यावेळी जि.प.अध्यक्ष राहुल पाटील,विद्या पाटील,सभापती.रसिका पाटील, सचिन बल्लाळ, विद्याधर गुरबे, तहशीलदार विनोद रणावरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे ,सभापती ॲड.अनंत कांबळे,मनीषा शिवणगेकर, सुमन सुभेदार, दीपक पाटील, विशाल पाटील,ॲड.संतोष मळविकर ,विठाबाई मुरकुटे अमर पाटील, राजू खमलेटी,विष्णु गावडे, संदीप नांदवडेकर,सरपंच तुकाराम कांबळे,भिकू गावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सटुप्पा फडके व सदानंद पाटील यांनी केले तर आभार जे. बी.पाटील यांनी मानले.
दौलत'चा प्रश्न सोडवणार ?
'दौलत' साखर कारखाना राजेश यांच्याकडे दिला आहे . त्यांच्या पाठीशी मंत्री हसन मुश्रीफ आहेत . तर गोपाळराव पाटील यांच्या बाजूने मी आहे , असे सतेज पाटील यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला . गोकुळसारखा अन्याय यापुढे होणार नाही . दौलतच्या थकबाकी आणि इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सोमवारी जिल्हा बॅकेत बैठक आयोजित केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment