मतदार जागृती स्पर्धा सहभागासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ - चंदगड लाईव्ह न्युज

24 March 2022

मतदार जागृती स्पर्धा सहभागासाठी निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ

मतदानाचे संग्रहित छायाचित्र

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार जागृती अभियान अंतर्गत प्रश्नमंजुषा, गीत गायन, व्हिडिओ तयार करणे, पोस्टर (भित्तिचित्र), व घोषवाक्य तयार करणे. या पाच स्पर्धांचे आयोजन केले आहे.

          स्पर्धेतील सहभागासाठी असलेली १५ मार्च ही मुदत वाढवून ३१ मार्च करण्यात आल्याची माहिती गडहिंग्लजचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी दिली आहे.

       बाराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी पासून मतदार जागरूकता स्पर्धा सुरू झाली आहे. मतदारांचे प्रबोधन करणे, त्यांचा निवडणूक कार्यक्रमातील सक्रिय सहभाग वाढवणे, त्यांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे हा स्पर्धेचा उद्देश असून सर्व वयोगटांसाठी ही स्पर्धा खुली ठेवण्यात आली आहे. "माझे मत माझे भविष्य, एका मताचे सामर्थ्य." हा स्पर्धेचा मुख्य विषय असून यातील विजेत्यांना भारतीय निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक भेटवस्तू, प्रमाणपत्र व १ हजार ते दिड लाख रुपये पर्यंतची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.

       'प्रश्नमंजुषा' स्पर्धेत स्पर्धकाची निवडणूक प्रक्रियेबाबत जागृकता तपासली जाईल. 'गीत गायन' स्पर्धेत 'माझे मत, माझे भविष्य' या विषयावर  गीत सादर करणे. 'व्हिडिओ मेकिंग' स्पर्धेत निवडणूक प्रक्रिया माहिती, प्रलोभनमुक्त मतदान, मतदानाची शक्ती, महिला, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, तरुण व नवीन मतदारांसाठी मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणे.  'पोस्टर तथा भित्तीचित्र' स्पर्धेत डिजिटल आरेखन किंवा रंगवलेली भित्तिचित्रे तयार करणे,. तर 'घोषवाक्य' स्पर्धेतून स्पर्धक मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करू शकतात. 

         अधिक माहितीसाठी चंदगड तहसील कार्यालय निवडणूक विभागात संपर्क साधावा व मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व तहसीलदार विनोद रणवरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment