कडलगे खुर्द येथील शेतात सापडलेला सात फुटी नाग |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील शेतकरी नामदेव दत्तू पाटील हे आपल्या शेतात ऊसाला पाणी देत असताना अचानकपणे सात फूट लांबीचा नाग अडिच फुटी फणा काढून समोर उभा राहिला. दि. २८ मार्च रोजी सकाळी अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नामदेव पाटील यांची घाबरगुंडी उडाली. तथापि प्रसंगावधान राखून त्यांनी जवळच्या शेतात काम करत असलेले शेतकरी शिवाजी पाटील यांना बोलावले त्यानंतर ढोलगरवाडी येथील सर्पमित्र प्रा. सदाशिव पाटील यांना फोन केला. तोपर्यत आजूबाजूच्या शिवारातील शेतकरी व बघ्यांनी सोमवार शिवदर्शन म्हणून गर्दी केली. सापाला लपण्यासाठी जागा नसल्याने तो अर्धा तास फणा उभारून फुत्कार करत होता.
शालेय कामात व्यस्त असलेल्या प्रा. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत हातात साप पकडण्याचे कोणतेही साधन नसताना शिताफीने सापाला पकडले. त्याला वन खात्याच्या सहकार्याने नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बी एम हिरेमठ, मनोहर गुरव, जयसिंग पाटील उपस्थित होते.
शेतकरी बांधवांना अशा प्रसंगांना नेहमीच तोंड द्यावे लागते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसा शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा अशी मागणी होत आहे. ही घटना रात्रीच्या वेळी घडली असती तर शेतकरी नामदेव पाटील यांच्या जीवावर बेतले असते.
No comments:
Post a Comment