पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विठ्ठल परीट यांना गुणवंत पशुवैद्यक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2022

पशुवैद्यकीय क्षेत्रातील डॉ. विठ्ठल परीट यांना गुणवंत पशुवैद्यक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

पुणे येथे पशुसंवर्धन मंत्री ना. सुनील केदार यांच्या हस्ते व सचिंद्र प्रताप सिंह पशुसंवर्धन आयुक्त, धनंजय परकाळे अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन यांच्या उपस्थितीत मानाचा 'गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार' स्वीकारताना डॉ. व्ही. के. परीट

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         सेवानिवृत्त सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठलराव कृष्णा (व्ही के) परीट यांना जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्त (३०/०४/२०२२) पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 'राज्यस्तरीय गुणवंत पशुवैद्यक पुरस्कार सन २०१५-१६' जाहीर झाला होता. हा मानाचा पुरस्कार २० मे २०२२ रोजी शरदचंद्र पवार सभागृह पुणे येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग पुणेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पशुसंवर्धन मंत्री ना सुनील केदार यांच्या हस्ते व सचिंद्र प्रताप सिंह पशुसंवर्धन आयुक्त, धनंजय परकाळे अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
       परीट यांचे मुळगाव कालकुंद्री (ता. चंदगड) असून कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील ३६ वर्षांच्या पशुवैद्यकीय सेवेत एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून ते जिल्ह्यात परिचित आहेत. त्यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल घेत ते कार्यरत असलेल्या दवाखान्याला सन २००६ मध्ये ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत 'आदर्श दवाखाना पुरस्कार' तत्कालीन पालकमंत्र्यांच्या हस्ते प्राप्त झाला होता. आपल्या कार्यकाळात चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले तालुक्यात पशुधनावरील उपचारांबरोबरच त्यांचे आरोग्य, उत्पादकता वाढवणे, दुधाळ जनावरे कशी निवडावी, चारा- पाणी व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदींबाबत पशुपालकांचे निरंतर प्रबोधन केले आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पशुसंवर्धन विभागाने राज्य स्तरीय पुरस्कार प्रदान केला यातच त्यांचे मोठेपण समजून येते.

No comments:

Post a Comment