कालकुंद्री विकास सेवा संस्था निवडणुकीत तिरंगी रस्सीखेच, वाचा कशा आहेत आघाड्या..... - चंदगड लाईव्ह न्युज

21 May 2022

कालकुंद्री विकास सेवा संस्था निवडणुकीत तिरंगी रस्सीखेच, वाचा कशा आहेत आघाड्या.....

                   

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
         कर्यात भागातील मोठ्या असलेल्या कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर विकास सेवा संस्थेची निवडणूक लागली असून मंगळवार दि. २४ मे २०२२ रोजी १३ जागांसाठी ४३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. या निवडणुकीत तिरंगी लढतीत मोठी रस्सीखेच दिसून येत आहे. चार-पाच अपक्ष उमेदवारांमुळे निवडणूक आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.
      चंदगड सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष एम. जे. पाटील व दौलत चे माजी संचालक अशोक रामू पाटील पुरस्कृत कलमेश्वर शेतकरी विकास आघाडी- चिन्ह नारळ, आमदार राजेश पाटील यांना मानणाऱ्या शिवाजी कोकीतकर, सलीम मोमीन, विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत श्री कल्मेश्वर विकास पॅनल चिन्ह- कपबशी, श्री कलमेश्वर अखंड नाम सप्ताह कमिटी पुरस्कृत श्री कल्मेश्वर भक्त मंडळ पॅनेल चिन्ह- टेबल अशी तीन पूर्ण पॅनल निवडणूक रिंगणात असून श्री कलमेश्वर शेतकरी सन्मान विकास आघाडी पुरस्कृत चार अपक्ष उमेदवार छत्री या चिन्हावर आपले नशीब आजमावत आहेत. 
     निवडणुकीत सर्वसाधारण कर्जदार खातेदार प्रतिनिधींच्या आठ जागांसाठी तब्बल २८ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. अनुसूचित जाती-जमाती गटातील एका जागेसाठी ४ उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी ६ उमेदवार, भटक्या- विमुक्त जाती/ जमाती गटातील एका जागेसाठी ३ उमेदवार तर इतर मागास गटातून एका जागेसाठी २ उमेदवारांत सरळ लढत होत आहे. निवडणुकीत क्रॉस मतदान झाल्यास बाद मते वाढण्याचा संभव असल्यामुळे मतदारांनी 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करावे. यासाठी उमेदवार व सर्वच पॅनेल प्रमुख पायाला भिंगरी लावून मतदार राजाचे उंबरे झिजवताना दिसत आहेत. तालुक्यातील बहुतांशी सेवा संस्था निवडणुका बिनविरोध झाल्या असल्या तरी कालकुंद्रीतील निवडणूक अनेक प्रयत्नानंतर बिनविरोध झाली नसल्याने सहकार क्षेत्राची नजर या निकालाकडे लागली आहे. मतदान २४ रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा कालकुंद्री येथे सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून यात ८१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

No comments:

Post a Comment