बसर्गेचे शहीद जवान प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

29 May 2022

बसर्गेचे शहीद जवान प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे शहीद जवान प्रशांत जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला जनसागर.

तेऊरवाडी / एस. के. पाटील

          लडाखमध्ये २२ मराठा लाईट इन्फैट्रीच्या सैन्याच्या वाहनाला भीषण अपघात झाला होता. सैन्याला घेऊन जाणारा हा ट्रक नदीत कोसळला होता. या अपघातात एकूण 7 जवान शहीद झाले होते. या अपघातात साताराचे विजय शिंदे आणि कोल्हापूरचे प्रशांत जाधव शहीद झाले. तुतर्क सेक्टरमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या भारतीय लष्करातील जवान प्रशांत जाधव यांच्यावर आज त्यांच्या बसर्गे (ता. गडहिंग्लज) या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

          यावेळी शहीद प्रशांत जाधव यांना श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील उपस्थित होते.

          आज सकाळी आठ वाजता विशेष विमानानं त्यांचं पार्थिव बेळगाव विमानतळावर आणण्यात आले. तेथून हे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. शहीद जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बसर्गेसह गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह कर्नाटकातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान त्यांचं पार्थिव घरी आणल्यानंतर पत्नी आणि आई - वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांच्या अंत्ययात्रा मार्गात ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत त्यांना अभिवादन केलं. लडाखमधील या अपघाताने देशाचं कधीच भरून न निघणारे नुकसान केले आहे. मात्र या जवानांचं हे बलिदान देश कधीच विसरणारही नाही.


विधवा प्रथा बंदीची सुरवात 

             दरम्यान आज गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे या गावांनाही आता विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यसंस्कारपासून याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आज अंत्यसंस्कारानंतरही प्रशांत जाधव यांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम राहिलंय.

बाळाच रडणं सर्वाना सुन्न करून गेल....

           नियतीने ही असा काही डाव मांडला की प्रशांत जाधव यांच्या आयुष्याचा खेळ अडखळला... बापाच्या खांद्यावर बसून मिरवायच्या वयात त्याच बापाला खांद्यावरून येताना पाहावं लागतंय .... तोंडातून "बाबा" हा शब्द देखील न उच्चारता येण्याच्या वयात त्याच बाबाच्या नावाची "शहीद जवान, अमर रहे" ची घोषणा कानावर पडतेय........ लाखोंच्या गर्दीत,, हजारोंच्या काळजांचा ठाव घेत, तिरंग्यात लपेटुन येणाऱ्या बापाला पाहून त्या कोवळ्या जीवाला काय वाटल असेल ... आणि त्या कोवळ्या जीवाकडे बघून प्रशांतची पत्नी व आई वडिलांना काय वाटल असेल .... काळजाचा कुटे तरी ठोकाच चुकला. सर्वजन या घटनेने निशब्द झाले.
No comments:

Post a Comment