'सबूद' नाटक पाहण्याची रसिकांना पुन्हा संधी! महानाट्याचा तिसरा प्रयोग ७ रोजी नागरदळेत - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2022

'सबूद' नाटक पाहण्याची रसिकांना पुन्हा संधी! महानाट्याचा तिसरा प्रयोग ७ रोजी नागरदळेत

सबुद


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

           पद्मश्री, स्वामीकार रणजित देसाई यांच्या 'बारी' कादंबरीवर आधारित 'सबूद' महानाट्याचा तिसरा प्रयोग शनिवार दि ७ मे २०२२ रोजी रात्री ९ वाजता नागनाथ हायस्कूल पटांगण नागरदळे (ता. चंदगड) येथे होणार आहे.

      ८ एप्रिल रणजित देसाई यांच्या जयंतीदिनी नाटकाचा पहिला प्रयोग कोवाड येथे संपन्न झाला होता. त्यानंतर कल्याण येथील अत्रे चित्रमंदिरातील प्रयोगाने (२४ एप्रिल) हाऊस फुल गर्दी खेचली. पहिले दोन्ही प्रयोग हृदयस्पर्शी ठरले. उद्घाटनाच्या पहिल्या प्रयोगावेळी वादळी वारे, पाऊस या नैसर्गिक आपत्ती मुळे नाट्य रसिकांचा हिरमोड झाला होता. तथापि नागरदळे ग्रामस्थांनी तालुक्यातील नाट्यरसिकांना या प्रयोगाच्या निमित्ताने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. नाट्य लेखक सना मोरे, निर्माता व गीतकार शिवाजी विष्णू पाटील (नागरदळे), संजय कृ. पाटील, संगीतकार विशाल बोरूले, पार्श्वगायक विजय बोराडे, डॉ नेहा राजपाल, संचिता मोरस्कर तर पार्शसंगीत आहे आनंद कुबल यांचे. नाट्य उभारणीत उद्योजक सत्तूराम मा. मणगुतकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. 

         महादेव पाटील, दयानंद सरवणकर, अमोल पाटील, शिवाजी वि. पाटील, शिवाजी द. पाटील, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, जकनू मुरकुटे, सुनील लोंडे, सुप्रिया गावकर, साक्षी घाणेकर, विलक्षणा मोरे, धनश्री मणगुतकर, सुवर्णा व बालकलाकार संस्कृती कुंभार हे चंदगड तालुक्यातील विविध गावचे कलाकार जीवन कुंभार यांच्या दिग्दर्शनाखाली आपले अभिनय कौशल्य पुन्हा सिद्ध करणार आहेत. 

          चंदगड तालुक्यातील नाट्यरसिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित महानाट्याचा आनंद लुटावा असे आवाहन 'नाट्यसंस्कार' च्या वतीने निर्माता शिवाजी पाटील, संजय पाटील, दिग्दर्शक जीवन कुंभार, ताम्रपर्णी प्रतिष्ठान कोवाडचे अध्यक्ष कृष्णा बामणे आदींनी केले आहे. 

No comments:

Post a Comment