चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ 'गोकुळ' मध्ये नुकतीच तीन तज्ञ संचालकांची निवड झाली. चंदगड तालुक्याला गोकुळ मध्ये प्रतिनिधित्व नसल्याने यावेळी कोणाची तरी वर्णी लागेल अशी शक्यता दूध उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. पण ती फोल ठरली व चंदगडची पाटी कोरीच राहिली. चंदगड तालुका गोकुळ दूध संघामध्ये नेहमीच उपेक्षित राहिला आहे. सुरुवातीच्या काळात अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधीत्व देऊन चंदगड ची बोळवण केली जात होती. गेल्या काही वर्षात तालुक्यातील ठराव धारकांची वाढती संख्या विचारात घेऊन महादेवराव महाडिक यांनी भरमूआण्णा पाटील गटाला दीपक पाटील यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिले. सन २०१३-१४ च्या निवडणूकीत तत्कालीन परिस्थितीनुसार दीपक पाटील व राजेश पाटील या दोघांनाही संचालक पदी संधी मिळाली.
२०२१ मधील निवडणूकीत सत्ताधारी महाडीक गटातून लढण्याची इच्छा असताना? आमदार राजेश पाटील यांनी आघाडी धर्म पाळत ना. सतेज पाटील आणि ना. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला साथ दिली. (अन्यथा गोकुळ मध्ये चंदगड ची स्थिती आज कदाचित वेगळी दिसली असती) सत्ताधारी महाडिक गटाकडून तत्कालीन संचालक दीपक भरमू पाटील यांनी तर विरोधी पाटील- मुश्रीफ गटाकडून राजेश पाटील यांच्या पत्नी सुस्मिता राजेश पाटील यांनी निवडणूक लढवली. दुर्देवाने दोघांचाही पराभव झाला. या निकालामुळे तालुक्याची संचालक पदाची पाटी कोरीच राहीली. २१ पैकी एकही संचालक चंदगडचा नाही. इतर तालुक्याला तीन- चार संचालक मिळत असताना चंदगडला एकही का नाही? याचा राग नेत्यांना नसला तरी दूध उत्पादकांना नक्कीच आहे.
निवडणूकीतील उणीवा तज्ञ संचालक निवडीवेळी दूर करत चंदगडला प्रतिनिधित्व देता आले असते. तथापि नैसर्गिक न्याया ऐवजी जिल्हा नेतृत्वाने आपली राजकीय सोय पाहिली व चंदगडला उपेक्षित ठेवले हे स्पष्ट दिसते.
गोकूळ दूध संकलन व विकासात मोठा वाटा असलेल्या चंदगड वरील अन्याय दूर झालाच पाहिजे. यासाठी सर्वपक्षीय ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. याचा सर्व नेते गटतट पक्ष यांनी विचार केला पाहिजे. असे विचार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहेत.
No comments:
Post a Comment