सुरक्षित चालक देशाचे भवितव्य - सालदाना, चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

06 May 2022

सुरक्षित चालक देशाचे भवितव्य - सालदाना, चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम

    चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात बोलताना लुकास सलदाना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ‘सुरक्षित चालक देशाचे भवितव्य’ या विषयावर राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि संगणक शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने र. भा. माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. 

        यावेळी बोलताना टाटा स्ट्राईव यांच्या व्यवस्थापन विभागात मॅनेजर म्हणून काम करत असणारे लुकास सलदाना म्हणाले की रस्त्यावर गाडी चालवित असताना सतत भान ठेवणे आवश्यक आहे. अनेक व्यक्ती निष्काळजीपणे नाहक जीव गमवतात. त्यात काही वेळेस पुरेशी काळजी घेऊनही समोरून येणाऱ्या वाहन चालकाच्या चुकीमुळे प्राण गमवावा लागतो. त्यामुळे टाटा स्ट्राईव सतत समाजामध्ये जाणीव निर्माण करत असते. याचाच एक भाग म्हणून टाटा स्ट्राईवच्या माध्यमातून डिफेन्स ड्रायव्हिंग नावाचे ॲप प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये एकूण चोवीस व्हिडिओज आहेत. जे रस्ते सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करतात. यावेळी श्री सलदाना यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना या ॲपचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करावा म्हणून स्वयंसेवकांनी सतत प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून अनेक लोकांचे प्राण यामुळे वाचतील असे आवाहन केले.  

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. व्ही. के. गावडे यांनी रस्त्यावर सुरक्षित गाडी चालविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. डी. कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. एन. के. पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आणि आभार प्रा. आर. व्ही. आजरेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment