किणी येथे होणारी क्रीडा नैपुण्य चाचणी रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2022

किणी येथे होणारी क्रीडा नैपुण्य चाचणी रद्द



चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         शिंगणापूर क्रीडा प्रशालेत प्रवेशासाठी चंदगड तालुक्यातील खेळाडूंची निवड शुक्रवार दि. १७ जून रोजी सकाळी ७ वाजता जयप्रकाश विद्यालय किणी येथे नियोजित नैपुण्य चाचणी रद्द करण्यात आली आहे.

        कोल्हापूर जिल्हा परिषद संचलित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर (ता. करवीर) येथे गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या क्रीडा प्रशालेत जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थी खेळाडूंची निवड केली जाते. त्यांना योग्य खुराक व प्रशिक्षण देऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवले जाते. प्रशालेतून अनेक दर्जेदार खेळाडू निर्माण झाले आहेत. 

        कोरोना काळात शालेय क्रीडा स्पर्धा होऊ न शकल्यामुळे तालुकास्तरावर क्रीडा नैपुण्य चाचणी घेऊन खोखो, कबड्डी, कुस्ती व सर्व मैदानी खेळ प्रकारातील खेळाडू मुले, मुली यांची निवड केली जाणार होती. चंदगड तालुक्यातील खेळाडूंची निवड  किणी येथे नियोजित होती. तथापि नियोजनात बदल झाला आहे. जिल्हास्तरावरून ऑनलाइन लिंक पाठवण्यात आली असून निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ती भरावयाची आहे. वेळेत लिंक भरणाऱ्या विद्यार्थ्यांची नैपुण्य चाचणी जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. परिणामी किणी येथे होणारी नैपुण्य चाचणी रद्द झाली आहे. याची तालुक्यातील सर्व शाळा व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभाग पंचायत समिती चंदगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment