जनावारांच्या तोंडचा घास कोण हिरावतोय? महिनाभरात दोन लाखांच्या गवत गंजींना आग - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2022

जनावारांच्या तोंडचा घास कोण हिरावतोय? महिनाभरात दोन लाखांच्या गवत गंजींना आग

संग्रहित छायाचित्र

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

          अतिवाड (ता. जि. बेळगाव) येथे गेल्या महिनाभरापासून गावातील शेतकऱ्यांच्या गवतगंजींना आग लावण्याचा प्रकार सुरुच आहे. आतापर्यंत पाच गवतगंजी अज्ञाताने पेटवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच आहे पण मुक्या जनावारांच्या तोंडचा घास कोण हिरावत आहे यांचा पोलिसांना शोध घेणे गरजेचे आहे.  

           गुरुवारी  रात्री येथील परशराम कागणकर यांच्याही  अचानक गवतगंजीला आग लागल्याचे गावकऱ्यांना दिसून आले. त्यामुळे गावकऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. गवतगंजीजवळच गावातीलच पाण्याचा टँकर उभा करण्यात आला होता. त्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील बहुतांशी गवत जळून खाक झाले. उर्वरित गवत आगीमुळे धुमसून खराब झाले. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. मागील महिनाभरापासून हा प्रकार सुरू आहे. आठ दिवसाच्या अंतराने गवतगंजी मुद्दामहून पेटवल्या जात आहेत, असा आरोप गावकऱ्यांतून करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका सहन करावा महिन्याभरापूर्वी गावातील शेतकरी आनंद  पाटील व महादेव पाटील यांच्यागंजींना सर्वप्रथम आग लावण्यात आली. यानंतर आठ दिवसातच संतू पाटील, त्यानंतर नारायण पाटील यांच्या गवतगंज्या पेटवण्यात आल्याने सुमारे आतापर्यंत दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती गावकऱ्यांतून देण्यात येत आहे. सध्या पावसाला प्रारंभ झाला आहे. त्यामध्येच गवतगंजी जळण्याचे प्रकार सुरू असल्याने गावकरी धास्तावले आहेत. याप्रकरणाचा शोध घेऊन दोषींचा शोध घ्यावा, अशी मागणी गावकऱ्यांतून करण्यात येत आहे. या प्रकाराने गावातील शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हा प्रकार थांबला नाहीतर आणखी काही शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा फटका बसण्याची शक्यता आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी ग्रामपंचायत व काकती पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment