कृषी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक - सूर्यकुमार सावंत-भोसले, माडखोलकर महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन व पालक मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

28 June 2022

कृषी व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक - सूर्यकुमार सावंत-भोसले, माडखोलकर महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन व पालक मेळावा

मार्गदर्शन करताना सूर्यकुमार सावंत भोसले. व्यासपीठावर मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

          "शेती व्यवसायाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन उत्पादन घ्यायला हवे. उत्पादित वस्तूंच्या बाजार भावाविषयी आणि निर्याती विषयी आवश्यक ते ज्ञान असायला हवे. दळणवळण व आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती किफायतशीर ठरू शकते. शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान गरजेचे ठरत आहे. हवामानाचा अंदाज, पावसाचा अंदाज, बी-बियाणांची माहिती, खते या सर्व गोष्टींची माहिती मिळू शकते. दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेतले तर निश्चितच शेतकऱ्याचे जीवन समृद्ध होईल. पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती व शेतीला पूरक असणारे जोड धंदे यांचे योग्य नियोजन केल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान निश्चितच उंचावेल." असे प्रतिपादन सूर्यकुमार सावंत भोसले यांनी केले.

       चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील पालक मेळावा व कृषी मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. प्रा. डॉ. आर. एन. साळुंखे यांनी प्रास्ताविकातून पालकांशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे, असे मत व्यक्त केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक या तीनही घटकात सुसंवाद असेल तरच उत्तम नागरिक घडतील असे सांगितले.

          अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी सध्याच्या स्थितीत शेतीला पुन्हा एकदा वैभवाचे दिवस येतील व शेती हा रोजगाराला उत्तम पर्याय ठरेल असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात पालकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. महाविद्यालय दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत असून प्रगतीचा आलेख उंचावत आहे. व्यवसायाभिमुख अभासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी कटिबद्ध आहे. पालकांनीही सातत्याने संपर्कात राहून सूचना केल्यास स्वागतार्ह असल्याचे सांगितले. प्रा. एस. के. सावंत, प्रा. डॉ. एम. एम. माने, शिवनगेचे माजी सरपंच अरुण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

           प्रा. डॉ. के. एन. निकम यांनी आभार मानले तर प्रा. एस. बी. दिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. मेळव्यास शेतकरी, पालक, विद्यार्थी यांच्यासह प्रा. आर. एस. पाटील, डॉ. एस. एस. सावंत, प्रा. डॉ. ए. वाय. जाधव, प्रा. डॉ. जी. वाय. कांबळे, हर्षाली सावंत-भोसले, चेतन शेरेगार उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment