पारगडच्या पाणीप्रश्नासाठी आमदार राजेश पाटील यांनी दरीमध्ये पायी केले वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2022

पारगडच्या पाणीप्रश्नासाठी आमदार राजेश पाटील यांनी दरीमध्ये पायी केले वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन

पारगडच्या पाणी प्रश्नासंदर्भात आमदार राजेश पाटील यांनी थेट पारगडच्या दरीमध्ये उतरून पाणीसाठ्यांची पहाणी केली.

तेऊरवाडी / एस. के. पाटील

        पारगड (ता. चंदगड) या ऐतिहासिक किल्याबरोबर परिसरातील गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याचे वृत्त आमदार राजेश पाटील यांना समजले. तात्काळ आमदार पाटील यानी पारगड वर जाऊन पाणी प्रश्नासंदर्भात स्वतः थेट दरिमध्ये उतरून  पायी चालत  वॉटर सोर्स सर्च ऑपरेशन केले.

       सध्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व एका अभ्यासू व्यक्तीच्या हाती आहे. शांत, संयमी  व्यक्तिमत्व असलेल्या आमदार राजेश पाटील यांना विविध प्रश्नांची चांगली जाणिव आहे. पारगडवर पाणीटंचाई लक्षात येताच तात्काळ पाणी पुरवठा उप अभियंत्या श्रीमती सुभद्रा कांबळे यांना याची माहिती दिली. येथील दरित असणारे नैसर्गिक जलस्रोत शोधण्याचे ठरवले. त्यानुसार स्वतः आमदार राजेश पाटील, सोबत सरपंच संतोष पवार, उपअभियंता शाखा अभियंता पृथ्वीराज पाटील, ग्रामसेवक संतोष तांबळे, माजी पो. पाटील नारायण गडकरी, कान्होबा माळवे, पत्रकार एस. के. पाटील, विश्वास पाटील यांच्यासह थेट दरीत उतरण्यास सुरवात केली. गर्द झाडी, समोर दरी, झाडा झुडपांनी आच्छादलेल्या जंगलातून वाट शोधताना सर्वांची दमछाक होत होती. आजूबाजूला जंगली प्राण्यांचा तर प्रचंड धोका.               कानावर केवळ पक्षांचा आवाज पडत होता. गर्द झाडीमुळे सुर्यदर्शन तर दुर्मिळ झाले होते. अशा कठीण परिस्थितीत अनेक जन पायाखालील दगड घसरून तर कधी पायात वेली अडकल्याने धडपडत होते. ऐकमेकांना हात देत आमदार पाटील दरीतील ओढ्यातील झऱ्या पर्यंत पोहचले. तेथील पाणी स्त्रोतासंदर्भात सविस्तर पहाणी करुन पुन्हा दरी चढून पारगड गाठला. पण या ठिकाणी आमदार पाटील यांच्या पायाला येथील जंगलातील कानिट लागल्याने पायातून रक्तस्राव होऊ लागला. त्याबरोबरच पत्रकार एस. के. पाटील व एन. एस. गावडे यांनाही कानिट चिकटले. तेथून पन्हा पाच कि. मी. अंतरावरील शेगलाच्या नदीमध्ये असणाऱ्या जलसाठ्याकडे आमदार पाटील पहाणीसाठी गेले. या ठिकाणी असणाऱ्या प्रचंड दगडांचा डोंगर चढताना व उतरताना प्रचंड धोका निर्माण झाला होता. 

           उपस्थितापैकी अनेकानी तिकडे जाणे टाळून आमदार राजेश पाटील यांना येथील प्रचंड धोक्याची जाणिव करून दिली. पण आमदार पाटील हा धोका पत्करून त्या पाणी साठ्यापर्यंत पोहचलेच. या दोन्ही जलस्त्रोत्रांची पाहणी करून अधिकारी व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.

No comments:

Post a Comment