पंधरा दिवसापूर्वी पारगड परिसरातील पाणी स्रोतांची पाहणी करताना आमदार पाटील यांचे सोबत ग्रामस्थ व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी.
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
किल्ले पारगड ग्रामस्थांची अनेक वर्षापासून 'राईचा गोट' येथील पाण्याच्या स्रोतापासून गडावर पाणीपुरवठा करावा ही मागणी आहे. या अनुषंगाने चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी किल्ल्यावर ५ व ६ जून २०२२ रोजी दोन दिवस मुक्काम करून ग्रामस्थ व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह डोंगर कपारी तील विविध पाण्याच्या स्रोतांची पाहणी केली. पाहणी अंती किल्ल्या पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील 'राईचा गोट' येथील पाणी गडावर आणण्याचे निश्चित करण्यात आले.
नळ पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तसे आदेश सोबतच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना पारगड ग्रामस्थांच्या समोर देण्यात आले. ५ जून रोजी ही पाहणी करण्यात आली होती. यानंतर दोन दिवसात येऊन सर्वे पूर्ण करतो असे अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदारांना संगितले. तथापि दोन आठवडे उलटले तरी संबंधित अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत. सर्व कामे सोडून गेले पंधरा दिवस अधिकाऱ्यांची चातकासारखी वाट पाहणारे ग्रामस्थ याबाबत संताप व्यक्त करताना दिसत आहेत. गेल्या ४-५ वर्षापासून याकामी चालढकल करणारे कार्यालय यावेळी तरी तात्काळ हालचाली करील, ही ग्रामस्थांची अपेक्षा फोल ठरते आहे. सध्या पाऊस कमी असल्यामुळे सर्वे चे काम पूर्ण झाले असते. पण एकदा पाऊस वाढला तर तिकडे जाणेही मुश्कील होते. याची जाणीव या अधिकाऱ्यांना असायला हवी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान हे पाणी मोटर पंपने गडावर पोचवण्यासाठी विद्युत सुविधा हवी, यासाठी वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांना आमदार पाटील यांनी याच वेळी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वीज कंपनीने राईचा गोट पर्यंत किती खांब उभारावे लागतील याबाबतचा सर्वे नुकताच पूर्ण केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार यांनी दिली. तर पारगड जनकल्याण मंडळाचे अध्यक्ष कान्होबा माळवे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या दिरंगाईबाबत आमदारांना कळवल्याचे समजते.
एकंदरीत अलीकडच्या काळातील गडावर येणाऱ्या शिवप्रेमी व पर्यटकांची संख्या कमालीची वाढली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मार्च महिन्यातच ग्रामस्थ व पर्यटकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. पाण्याअभावी ग्रामस्थांना पावसाळा सुरू होईपर्यंत अन्यत्र स्थलांतरित होण्याची नामुष्की ओढवते. हे टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागाने योजनेच्या पूर्ततेसाठी युद्धपातळीवर कामाला लागले पाहिजे. तसेच याकामी आमदारांनीही कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी पर्यटकांतूनही होत आहे.
No comments:
Post a Comment