प्रा. आर. व्ही. गुरव बोलताना. व्यासपीठावर मान्यवर. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
र. भा. माडखोलकर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देण्याची परंपरा अव्याहत जपली आहे. महाविद्यालयाने आज विविध क्षेत्रात आपापल्या कतृत्वाने कार्यरत असणारे अनेक विद्यार्थी घडवून नावलौकिक संपादन केलेला आहे. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पदवीधरांच्या प्रथम बॅचचे सर्व विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम निश्चितच संस्मरणीय ठरेल." असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. व्ही. गुरव यांनी केले.
चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयाने रौप्यमहोत्सवा निमित्त आयोजित केलेल्या पदवीधरांच्या प्रथम बॅचचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक लक्ष्मण गावडे यांनी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पहावीत व ती प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन केले. स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या स्थित्यंतराचे साक्षीदार व्हावे. यासाठीच त्यांच्यासाठी मुद्दाम या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे सांगितले. र.भा .माडखोलकर महाविद्यालय हे समाज विकासाचे केंद्र आणि प्रेरणा स्रोत आहे.महाविद्यालयाने शैक्षणिक उपक्रम, शिक्षण पूरक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले आहेत.
कार्याध्यक्ष प्रा. एस. के. सावंत यांनी प्रतिकूल परिस्थिती, भौतिक सुविधांचा अभाव, यावर मात करत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयावर विश्वास दाखविला. निधी संकलनासाठी संस्थेने अनेक उपक्रम राबवले. अनंत अडचणीवर मात करत प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी हितचिंतक यांच्या पाठबळावर महाविद्यालयाने केलेल्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. किरण पाटील यांनी पंचवीस हजाराच्या ठेवीवरील व्याजातून आदर्श विद्यार्थ्यास पारितोषिक देण्याचा प्रस्ताव मांडला. दोन हुशार व गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारण्यास तयारी दर्शवली. संतोष घवाळे यांनी दहा हजार तर संभाजी देसाई यांनी पाच हजारांची देणगी जाहीर केली. हर्षवर्धन भोसले, बाबूराव पेडणेकर, उत्तम गावडे, सुषमा पाटील, अमिता शिरसाट, राम चांदेकर, संतोष गावडे, पांडुरंग भोगण, राजू व्हटकर यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यार्थाना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
प्रारंभी सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करण्यात आले. प्रा. मयुरी कांडर यांनी स्वरचित कविता सादर केली. रौप्यमहोत्सव समिती सचिव प्रा. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अध्यक्ष प्रा. आर. पी. पाटील यांनी संस्कारांची शिदोरी, कृतज्ञता बुद्धी, संवेदनशीलता जतन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी स्नेहभावना जपून ठेवावी तसेच परस्पर सौहार्दाचे वातावरण टिकवून ठेवावे असे सांगितले.
कार्यक्रमास माजी प्राचार्य एस. व्ही. गुरबे, माजी प्राचार्य एस. आर. देशमुख एल. डी. कांबळे, नागोजी साळुंखे, उद्योजक शंकर वाली यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. समन्वयक प्रा. डॉ. के. एन. निकम यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रा. आर. एन. साळुंखे यांनी मानले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.
No comments:
Post a Comment