ट्रकने चिरडल्याने चौथीत शिकणाऱ्या शाळकरी बालकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी, कोठे घडली घटना......... - चंदगड लाईव्ह न्युज

03 August 2022

ट्रकने चिरडल्याने चौथीत शिकणाऱ्या शाळकरी बालकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी, कोठे घडली घटना.........

अपघातानंतर घटनास्थळी झालेली बघ्याची गर्दी, अपघातग्रस्त ट्रक व पोलिस.

बेळगाव / सी. एल. वृत्तसेवा

        लोखंडाने भरलेल्या ट्रकने एका शाळकरी बालकाला जोराची धडक दिल्याने सदर बालक जागीच ठार झाला असून त्याचा या अपघातात चेंदामेंदा झाला आहे. सदर घटना आज सकाळी बेळगाव शहारातील कॅम्प परिसरात घडली. या दुर्घटनेत बेळगाव येथील इस्लामिया उर्दू शाळेचा इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी अरहान बेपारी (वय -११, बेळगाव) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याबरोबर असलेली त्याची  बहीण अतिका आणि आयुष आजरेकर हा ज्योती सेंट्रल स्कूलचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. जखमींना जिल्हा रुग्णांलयात दाखल करण्यात आले आहे. 

       कॅम्प येथे मार्गावर स्पीड बेकर नसल्याने अनेक अवजड वाहने सुसाट वेगाने धावत असतात.  या भागात अनेक शाळा असल्याने विद्यार्थ्यांची गर्दी देखील मोठ्या प्रमाणात झालेली असते. आज  सकाळी या ठिकाणी वेगाने असणाऱ्या एका लोखंडने भरलेल्या ट्रकने बालकास जोराची धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्यामुळे कॅम्प परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

           तसेच येथील नागरिकांनी सदर ट्रकला अडविले असून जोपर्यंत  यावर कारवाई होत नाही. तो पर्यंत या ठिकाणी ठाण मांडून बसण्याचा निर्धार केला आहे. अपघात घडला तेव्हा या ठिकाणी बघायची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील आला होता. दोन दिवसांपूर्वी शहरात असाच अपघात फोर्ट रोड वरील खिमजीभाई पेट्रोल पंपा समोर घडला होता. आणि या घटनेत एका  सोळा वर्षीय महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाला होता.

         तर आता आज सकाळी घडलेल्या घटनेत शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत झाल्याने शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी घटनास्थळी सदर बालकाच्या कुटुंबीयांचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी सदर अपघाताची माहिती मिळतात उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच गुन्हेगारी विभाग पोलीस आयुक्त पी स्नेहा यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन या ठिकाणी पंचनामा केला.

          संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. शहर उपनगर परिसरात होत असलेल्या वाढत्या अपघातांबद्दल नागरिक आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. अवघ्या दोनच दिवसांपूर्वी जुन्या भाजी मार्केट जवळ वाळूने भरलेल्या ट्रकच्या धडकेमध्ये एक कॉलेज विद्यार्थिनी ठार झाली होती.

         शहरात सकाळी घडलेल्या या घटनेमुळे या ठिकाणी रहदारी पोलीस निरीक्षक कायम ठाण मांडून राहावे अशी मागणी नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच या संदर्भात चर्चा करण्यात येत असून यावर लवकरच  निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

No comments:

Post a Comment