चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या चंदगड तालुका पत्रकार संघाला 'राष्ट्रीय लोक प्रतिमा पुरस्कार' घोषित झाला आहे. शामरंजन बहुउद्देशीय फाउंडेशन मुंबई व विद्यार्थी विकास अकादमी महाराष्ट्र यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती व संघटना यांचा सन्मान केला जातो. या संस्थेच्या वतीने वरील पुरस्कार घोषित झाला आहे.
पुरस्कार वितरण कार्यक्रम 'राष्ट्रीय संस्कृती संगम संमेलन, बेळगाव, २०२२' बॅनर अंतर्गत लोकमान्य रंगमंदिर, रिझ टॉकीज कोनवाळ गल्ली बेळगाव येथे मंगळवार दि. १६ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ११.०० वाजता जेष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे व डॉ स्मिता कोल्हे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
२० मे १९९४ रोजी चंदगड तालुका पत्रकार संघाची स्थापना (रजिस्टर) झाली होती. गेल्या अठ्ठावीस वर्षात पत्रकार संघाने विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल च्या माध्यमातून बातम्या देऊन सर्वसामान्य जनतेच्या विविध समस्या व मागण्या शासन व प्रशासनाच्या निदर्शनास आणणे, अन्यायाला वाचा फोडणे, चांगल्या व आदर्श गोष्टींना प्रसिद्धी देणे, यासह तालुक्यातील दुष्काळ, अतिवृष्टी, पूरस्थिती, वादळ, कोरोना संकट आदी प्रसंगीचे वास्तववादी लेखन व चित्रण केले आहे. पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोना काळात परप्रांतीयांना त्यांच्या गावापर्यंत पोचवण्यासाठी केलेले कार्य, संकट समयी गरजूंना रोख रक्कम, धान्य, कपडे आदी जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप, विविध प्रसंगी रुग्णांना फळे वाटप, गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन व मार्गदर्शन, मुख्यमंत्री, पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी केलेली मदत, चंदगड तालुक्यातील जनतेसाठी 'आपल्या हक्काचे व्यासपीठ' म्हणून गेल्या चार वर्षांपासून सुरू केलेले 'चंदगड लाईव्ह पोर्टल चॅनल', या माध्यमातून सुरू असलेले समाजकार्य, अशा अनेक सेवाभावी उपक्रमांची दखल पुरस्काराच्या निमित्ताने श्यामरंजन फाउंडेशनने घेतली आहे.
No comments:
Post a Comment