कोवाडच्या अर्ध्या बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी, व्यापाऱ्यांकडून साहित्याची आवराआवर, ताम्रपर्णीने गाठली यंदाची सर्वाधिक पाणी पातळी - चंदगड लाईव्ह न्युज

11 August 2022

कोवाडच्या अर्ध्या बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी, व्यापाऱ्यांकडून साहित्याची आवराआवर, ताम्रपर्णीने गाठली यंदाची सर्वाधिक पाणी पातळी

कोवाड बाजारपेठेत शिरलेले पुराचे पाणी

विशाल पाटील / कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

             चंदगड तालुक्यात गेल्या चार दिवसातील अतिवृष्टीमुळे तालुक्याची जीवन वाहिनी ताम्रपर्णी ची सर्वोच्च पाणी पातळी नोंद झाली आहे. वाढत्या पाणी पातळीमुळे तालुक्यातील सर्वात मोठी कोवाड बाजारपेठ निम्मी पाण्याखाली गेल्याचे चित्र असून काठावरील सर्व नागरिक व व्यापारी बंधू सतर्क झाले आहेत. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. 

  जुन्या कोवाड बंधाऱ्यावर ताम्रपर्णी नदीची आजची पाणी पातळी.

          गेल्या दोन दिवसात तुलनेने  पावसाचे प्रमाण कमी असले तरी तालुक्यातील घटप्रभा- फाटकवाडी, झांबरे- उमगाव, जंगमहट्टी हे मध्यम प्रकल्प तर दिंडलकोप, जेलुगडे, कळसगादे, किटवाड नंबर १ व २, कुमरी, पाटणे, सुंडी, काजीर्णे आदी लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर लकीकट्टे, हेरे, आंबेवाडी हे लघु पाटबंधारे तलाव प्रकल्प येत्या एक-दोन दिवसात ओव्हरफ्लो होणार आहेत. या सर्व प्रकल्पांचे ओव्हर फ्लो झालेले पाणी ताम्रपर्णीत आल्यामुळे पूरस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.  

कोवाड नजीक ढोलगरवाडी, कडलगे, किणी  मार्गावर आलेले पाणी

               दरम्यान तालुक्यातील कोवाड माणगाव सह बहुतांशी बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे तालुक्यातील अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.  कोवाड बाजारपेठेत पाणी घुसल्यामुळे दुंडगे कडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. कोवाड नजीक कागणी रस्त्यावर तीन फूट पाणी आल्यामुळे आजरा, गडहिंग्लज, नेसरी, कोवाड ते बेळगाव एसटी सह सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. तर पोवाडा नजीक किनी फाट्यावर पुराचे पाणी आल्यामुळे ढोलगरवाडी, कडलगे, किणी कोवाड मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिणामी छोटी चारचाकी वाहने व दुचाकीची दुंडगे बंधाऱ्यावरून धोकादायक रित्या वाहतूक सुरू आहे.

No comments:

Post a Comment